• Sun. Sep 13th, 2026

Crime News: SBI मध्ये कॅश काऊंटरवर मिरचीपूड फेकली, ४ लाख घेऊन धूम ठोकली; पण अवघ्या ३० मिनिटांत दरोडेखोराचा खेळ खल्लास!

Nagpur News: पोलीस आरोपीची चौकशी करीत असून, दरोड्यापूर्वी त्याने बँकेची रेकी केली होती का, त्याला या घटनेत कोणाची मदत होती का आणि त्याचा नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.

SBI मध्ये कॅश काऊंटरवर मिरचीपूड फेकली, ४ लाख घेऊन धूम ठोकली(फोटोLipi)
नागपूर : नागपूरच्या सक्करदरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या शाखेत दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. सामान्य ग्राहक असल्याचे भासवत बँकेत शिरलेल्या तरुणाने कॅश काऊंटरवर जाताच कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत लाल मिरचीची पूड फेकली. कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आत त्याने कॅश काऊंटरवरील सुमारे ४ लाख रुपयांची रोकड हिसकावली आणि बँकेबाहेर धूम ठोकली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे त्याचा डाव फसला. बँकेपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर पळत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांत घेरून जेरबंद केले. त्याच्याकडून लुटलेली संपूर्ण रक्कमही हस्तगत करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज भोजराज बोरकर (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूरच्या सक्करदरा परिसरातील एसबीआय शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना सुरज हा सामान्य ग्राहक बँकेत दाखल झाला. त्याने काही वेळ बँकेत थांबून परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर तो थेट कॅश काऊंटरजवळ पोहोचला. कॅश काऊंटरवर जाताच सुरजने खिशातून लाल मिरचीची पूड काढली आणि क्षणाचाही विलंब न लावता समोर असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत ती भिरकावली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत तीव्र जळजळ सुरू झाली. काही क्षणांतच बँकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कर्मचारी डोळे चोळत असतानाच आरोपीने कॅश काऊंटरवरील रोकड आपल्या ताब्यात घेतली. आरोपीने अंदाजे ४ लाख रुपयांची रोकड घेऊन बँकेबाहेर पळ काढला. काही अहवालांमध्ये ही रक्कम ४.५३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरोडा टाकल्यानंतर आरोपी पळून जात असताना बँकेतील काही कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकाने धाडस दाखवत त्याचा पाठलाग सुरू केला. गर्दीचा फायदा घेत सुरज काही अंतरापर्यंत पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, बँक व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. बँकेतील तसेच परिसरातील कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपी कोणत्या मार्गाने गेला त्याचा शोध घेत पोलिसांनी परिसरात तत्काळ शोधमोहीम सुरू करून पेट्रोलिंग पथकांना सतर्क केले. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असतानाच बँकेपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सुरज पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याला पकडले, अवघ्या ३० मिनिटांत अटक केली. त्याच्याकडून लुटलेली रोकडही सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, या संपूर्ण थरारक घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. आरोपीने बँकेत प्रवेश करण्यापासून ते मिरचीपूड फेकून रोकड घेऊन पसार होईपर्यंतच्या हालचाली फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा