Vakola BKC Flyover Update: मुंबईत आता ट्रॅफिकच्या समस्या मोठा त्रासाचा विषय बनला आहे. त्यातच आता वाकोली-बीकेसीदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या उड्डाणपुलाबद्दल मोठी अपडेट आली आहे. या पुलामुळे ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळू शकतो. जूनअखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला वाकोला-बीकेसी उड्डाणपूल आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माहितीनुसार, या पुलाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील १० ते १२ दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जूनच्या अखेरीस या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर वाकोला ते बीकेसीदरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. सध्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर वाहनचालकांचा मोठा वेळ खर्च होतो. मात्र नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत पार करता येणार आहे.
अनेक मुदतीनंतर प्रकल्प अंतिम टप्प्यात
सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तार योजनेअंतर्गत तीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. त्यापैकी दोन पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र बीकेसी-वाकोला पूल विविध कारणांमुळे वारंवार रखडला.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनेक वेळा नवीन मुदती जाहीर करण्यात आल्या होत्या. एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र ते शक्य झाले नाही. आता बहुतांश काम पूर्ण झाल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Crime News: नागपुरातील दर्ग्यात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; नकार देताच विचित्र प्रकार, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
आचारसंहितेमुळे उद्घाटनाला ब्रेक
काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने पूल सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे २५ जूनपूर्वी या पुलाचे उद्घाटन होऊ शकत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर पुलाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी घटणार
सुमारे १.२ किलोमीटर लांबीच्या या दोन मार्गिकांच्या पुलासाठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ परिसर आणि बीकेसीकडे जाणारी वाहतूक या पुलामुळे अधिक वेगवान होणार आहे.
एमएमआरडीएच्या मते, हा पूल सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्ग, वाकोला आणि बीकेसीदरम्यानचा प्रवास २० ते २५ मिनिटांनी कमी होईल. त्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यानचा संपर्क अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा