• Fri. Jun 5th, 2026

    नाशकात पासिंग आऊट परेड; पायलटकडून हेलिकॉप्टरसमोर GFला प्रपोज; VIDEO गाजला, आता कॅप्टन गोत्यात

    नाशकात पासिंग आऊट परेड; पायलटकडून हेलिकॉप्टरसमोर GFला प्रपोज; VIDEO गाजला, आता कॅप्टन गोत्यात

    नाशिकमध्ये लष्कराची पासिंग आऊट परेड झाली. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजला. पायलटचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅप्टननं प्रेयसीला प्रपोज केलं. या प्रपोजलचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: दोन दिवसांपूर्वी नियुक्ती झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाशिकमधील पासिंग आऊट परेडनंतर लष्कराच्या पायलटनं त्याच्या प्रेयसीला हेलिकॉप्टरच्या समोर एका गुडघ्यावर बसून लग्नासाठी विचारणा केली. या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच गाजला. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. यानंतर आता संबंधित पायलटवर लष्कराकडून कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

    भारतीय लष्कर कडक शिस्तीसाठी ओळखलं जातं. शिस्त मोडल्यास लष्कराकडून जवानांवर, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होते. त्यामुळे लष्करात पायलट झालेल्या जवानानं वर्दीत असताना, पासिंग आऊट परेडनंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरसमोर केलेलं प्रपोज चर्चेचा विषय आहे. याबद्दल उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं आहे.

    कॅप्टन भरत भारद्वाज यांनी नुकतंच लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं. ते लष्करात पायलट म्हणून रुजू होतील. लष्करातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत भारद्वाज यांना कारणे दाखवा नोटिस बजावली जाण्याची दाट शक्यता आहे. भारद्वाज यांची कृती सैन्य शिष्टाचार आणि मर्यादांचा भंग करणारी असू शकते. त्यामुळे भारद्वाज अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत.

    नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी ऍव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधील (CAATS) पासिंग आऊट परेड आणि दीक्षांत सोहळ्यानंतर ट्रेनी पायलट त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत होते. त्याचवेळी आर्मी पायलटनं पासिंग आऊट परेडनंतर त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. स्वत:च्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस होणाऱ्या पत्नीसाठीही अविस्मरणीय ठरावा, या हेतूनं भरत भारद्वाज यांनी प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं.

    नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी ऍव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या पासिंग आऊट परेडनंतर हा सगळा घटनाक्रम घडला. भरत यांनी कुटुंबीय, सहकारी अधिकाऱ्यांसमोरच त्यांची प्रेयसी आरुषीला प्रपोज केलं. एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रसंग उपस्थितांना पाहायला मिळाला. भरत यांनी लष्करी गणवेशात, हेलिकॉप्टरच्या समोर एका गुडघ्यावर बसून आरुषीला प्रपोज केलं. तिला खास अंगठी दिली. आश्चर्यचकित झालेल्या आरुषीनं लाजत लाजत होकार दिला. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा