• Fri. Jun 5th, 2026
    Pune Crime: सॅकमध्ये सोनोग्राफी मशिन, पुण्यात बारावी पास तोतया डॉक्टरने हजारो महिलांची केली तपासणी, कसं फुटलं बिंग?

    म.टा.प्रतिनिधी, पुणे: जिल्ह्यातील यवत परिसरातील एका तोतया डॉक्टरने गेल्या अडीच वर्षांत हजाराहून अधिक महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटची व्याप्ती पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही पसरली आहे. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

    पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत केडगाव परिसरात केलेल्या कारवाईत मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड) आणि डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव) यांना अटक करण्यात आली. एजंट नरेंद्र ठाकरे, डॉ. मंदार माळी आणि डॉ. सुंदरम कदम यांच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Vikram Kakade : विक्रम संजय काकडेंची मालमत्ता 150 करोड, दुबईत आलिशान फ्लॅट, जय पवारांना 10 कोटींचं कर्ज दिल्याचं उघड
    आरोग्य विभागाला गर्भलिंगनिदानाचा एक व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात आरोपी गिरी हा विविध गावांमध्ये जाऊन महिलांची सोनोग्राफी करत असल्याचे उघड झाले. गिरी हा तोतया डॉक्टर असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने फार्मसीचे शिक्षण अपूर्ण सोडले होते. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करताना मिळालेल्या अनुभवाचा वापर करून त्याने हा बेकायदा धंदा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    ३० ते ५० हजार रुपये दर
    तपासादरम्यान आरोपी प्रत्येक गर्भलिंगनिदानासाठी ३० ते ५० हजार रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांकडून यापेक्षाही अधिक रक्कम वसूल केली जात होती. आरोपी दरमहिन्याला गर्भलिंगनिदानासाठी सुमारे ४० सोनोग्राफी करीत होता.

    Maharashtra TimesPune Crime: धर्मांतरास नकार दिल्याने महिला कर्मचारी बडतर्फ; हिंजवडीतील बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकार
    सॅकमध्ये सोनोग्राफी मशिन
    अडीच वर्षांपूर्वी अण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशिन घेतले. गर्भलिंगनिदानानंतर काही महिलांना गर्भपातासाठी वाघोली येथील डॉ. अतुल जाधव यांच्या दवाखान्यात पाठविले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. गिरी हा पाठीवरील सॅकमध्ये ते मशिन घेऊन महिलांच्या घरी जाऊनच सोनोग्राफी करीत होता.

    संबंधित महिलांचा शोध सुरू
    या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. बँक व्यवहार, मोबाइल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू असून, मागील पाच वर्षांत हजारो महिलांची गर्भलिंग चाचणी करण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या महिलांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, गर्भलिंगनिदान करून घेतलेल्या कुटुंबांची भूमिकाही तपासली जात आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याविरोधातही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

    Maharashtra TimesPune IT Scam: ‘असा’ घोटाळा कधी ऐकीवात नसेल, पुण्यातली IT कंपनीच निघाली फ्रॉड; 700 तरुणांची स्वप्नं उद्ध्वस्त, CEOला अटक
    गर्भलिंगनिदान प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. तांत्रिक तपासातून १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्काचे धागेदोरे हाती लागले आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेले डॉक्टर आणि सोनोग्राफी केलेल्या महिलांचे कुटुंबीय यांना शोधून काढण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू आहे. – संदीपसिंग गिल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

    पुण्यातील डॉक्टरचे आरोपीला दीडशे कॉल
    तपासात एक डॉक्टर आणि गिरी यांच्यात वारंवार संपर्क झाल्याचे आढळून आले आहे. संबंधित डॉक्टरला याबाबत विचारणा करण्यात आली असता, जमिनीच्या व्यवहारासंदर्भात संपर्क झाल्याचे स्पष्टीकरण त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरू आहे. तपासादरम्यान एका डॉक्टरकडून गिरीला तब्बल दीडशेहून अधिक कॉल करण्यात आल्याची बाबही समोर आली असून, त्या अनुषंगाने पोलिस अधिक तपास करीत आहेत

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed