Chandrashekhar Bawankule : सपकाळांना राज्यात फिरु देणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा, असं का म्हणाले?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे. बुधवारी नागपुरात बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात करण्यात आलेली टीका ही अश्लील, नीच आणि नालायकपणाची आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली राजकीय उंची आणि आपण कोणाविरोधात बोलत आहोत, याचे भान ठेवावे. यापुढे त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याविरोधात अशा प्रकारची भाषा वापरली, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा वक्तव्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण होऊ शकतो’, असा इशाराही त्यांनी दिला.
