• Sun. Jun 7th, 2026
    मुंबईत हक्काचं घर घेण्याची अंतिम संधी! म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस; ८८ हजार अर्ज दाखल

    MHADA Lottery 2026: सुरुवातील अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईत म्हाडाच्या घरांची किंमत कमी करून अर्ज भरण्याची मुदत वाढवली होती. 28 मे ही अंतिम संधी असून मुदतवाढीनंतर उदंड प्रतिसाद मिळाल्याची नोंद झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या २,६४० घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आज, २८ मे ही अंतिम संधी आहे. सुरुवातीला अर्जदारांनी सोडतीकडे पाठ फिरवली होती. मात्र, विक्रोळीतील घरांच्या किंमती कमी करतानाच सोडतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय पथ्यावर पडला आहे. त्यातून आत्तापर्यंत ८८,७६३ अर्ज दाखल झाले असून ६२,४२० अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन सहभागी निश्चिती केली आहे.

    कशी असेल प्रक्रिया?

    म्हाडा मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार २८ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. त्यासाठी २९ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाइन भरता येईल. अर्जदारांना २९ मे रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीमार्फत अनामत रक्कम भरता येईल. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी दुपारी ३ वाजता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. १२ जून, २०२६ रोजी दु. ३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे-हरकती दाखल करता येतील.

    या सोडतीमध्ये मुंबईतील विक्रोली, गोरेगाव, बोरिवली, गोराई, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, वडाळा, पवई, दादर आणि मान्खुर्द सारख्या ठिकाणी घरं उपलब्ध असतील. या २,६४० घरांपैकी १, ७६२ घरांचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही. या इमारती विक्रोळी, गोरेगाव आणि बोरिवलीमधील असतील. यापैकी १२८ सदनिका बोरिवली पूर्व येथील आहेत तर ८५ गोरेगाव पश्चिमेतील. उर्वरित सदनिका विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे आहेत.

    सुरुवातीला कमी प्रतिसाद

    सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी 16 जून रोजी प्रकाशित केली जाणार आहे. पुढील माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यंदा म्हाडाच्या अर्ध्याहून अधिक घरांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. अल्प प्रतिसादामुळे अर्ज भरण्याची तारीखही वाढवली गेली होती. सुमारे १, २२१ घरांच्या किंमतीमध्ये 7.5 टक्के घट झाली होती. यामध्ये विक्रोळीतील उच्च आणि मध्यम उत्पन्न गटातील ६१० घरांचाही समावेश आहे.

    Maharashtra TimesMumbai Monorail: आठ महिन्यांनंतर पुन्हा धावणार ‘मोनोरेल’; या आठवड्यात अंतिम चाचणी, कधी सुरू होणार सेवा?

    दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागड्या घरांचा समावेश आहे. या घरांची किंमत ६.८२ कोटी रुपये आहे. दरम्यान, सर्वात कमी दर असलेली घरं मान्खुर्दमध्ये उपलब्ध आहेत. येथे 29 लाखांपासून किंमतीची सुरुवात होते. दरम्यान, गोरेगावमधील 300 चौरस फूट घरांची किंमत 32 लाखांपर्यंत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा