• Sat. Jun 6th, 2026

    मुंबईत रात्रीही उकाड्याचा त्रास, मोसमातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद; मान्सूनबाबतही हवामान विभागाची माहिती

    मुंबईत रात्रीही उकाड्याचा त्रास, मोसमातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद; मान्सूनबाबतही हवामान विभागाची माहिती

    Mumbai Weather: मुंबईकर मान्सूनपूर्व पावसाची वाट पाहत असताना उष्णता कमी व्हायचं काही नाव घेईना. किमान तापमानाचा पारा चढाच असून रात्रीही नागरिकांना दिलासा नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दिवसभर उष्मा आणि उन्हाच्या झळांनी त्रासलेल्या मुंबईकरांना शनिवारी मध्यरात्रीही तापमानाचा दिलासा मिळाला नाही. रात्रीही उष्म्याची जाणीव कायम असल्याने एसी, कूलरचा आधार शोधतच मुंबईकरांना शुक्रवार आणि शनिवारदरम्यानच्या मध्यरात्री झोपेची आराधना करायला लागली. वातावरणामध्ये उष्णता साचून राहिल्याने उष्णतेचे गाठोडे निर्माण झाल्यासारखी स्थिती असल्याची जाणीव मुंबईकरांनी व्यक्त केली.

    सांताक्रूझ येथे शनिवारी सकाळी २९.७, तर कुलाबा येथे २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशांनी अधिक होते. शनिवारी सकाळी कुलाबा येथे ९१ टक्के, तर सांताक्रूझ येथे ७४ टक्के सापेक्ष आर्द्रतेची नोंद झाली. शनिवारी सकाळी सांताक्रूझ येथे नोंदले गेलेले किमान तापमान मुंबईतील या मोसमातील सर्वाधिक किमान तापमान होते. वातावरणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने किमान तापमानाचा पारा चढा आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे रात्रीही तापमानाचा पारा खाली उतरत नसल्याने मुंबईकरांना अस्वस्थता जाणवत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

    Maharashtra TimesWeather Update: ढगाळ वातावरण… असह्य उकाडा; मुंबईत सकाळी रिमझिम पावसाची हजेरी; पण मान्सूनपूर्व सरींची अजून प्रतीक्षाच

    मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर उष्णतेची जाणीव कायम होती. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी किमान तापमानाचा पारा चढाच राहील, तर दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊ शकतो. त्यामुळे काही अंशांनी कमाल तापमान खाली उतरू शकेल. मात्र हा दिलासा फार मोठा नाही.

    कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

    राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये तसेच या जिल्ह्यांच्या घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना’यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा येथे उष्णतेच्या लाटेसाठी ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ येथे रविवारसाठी ‘ऑरेंज अॅलर्ट’ असून सोमवारसाठी ‘रेड अॅलर्ट’ आहे. विदर्भामध्ये वाशिम आणि बुलडाणा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते.

    वादळी पावसाने सिन्नर, मनमाड, येवलाला झोडपले

    तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. कोळगाव माळ, लक्ष्मणपूर, शहा आणि पाथरे परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्र्याची छते उडून गेली, तर डाळिंब बागा आणि शेततळ्यांचेही नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे.

    Maharashtra TimesWeather Update: अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांवर मोठा परिणाम; मान्सून आगमनासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, ‘स्कायमेट’चा अंदाज

    सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. लक्ष्मणपूर येथील चांगदेव लक्ष्मण गवांदे आणि नाना नामदेव सैंदर यांच्या घरांची पत्र्याची छते उडाल्याने घरातील धान्य व संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. कोळगाव माळ येथील अनिस गुलाब पटेल, हसन गुलाब पटेल आणि शकील गुलाब पटेल या तिन्ही भावंडांच्या घरांची छते उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा