• Sun. Jun 7th, 2026
    Udayanraje Bhosale: ‘इतर कामांसाठी निधीच उरत नाही…’; लाडकी बहीण योजनेवर उदयनराजे स्पष्टच बोलले!

    Satara Politics : ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण वाढल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केले. विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा: महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच, आता खुद्द महायुतीमधील बड्या नेत्यानेच या योजनेवर थेट बोट ठेवले आहे. “लाडकी बहीण योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून विविध ठिकाणी जितका विकासकामांचा निधी पोहोचायला पाहिजे, तितका तो पोहोचत नाहीये,” असे अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजेंच्या या घरच्या आहेरामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शहरातील प्रलंबित विकासकामे, प्रभागनिहाय निधीचे नियोजन आणि पालिकेच्या कारभारावर सविस्तर खल झाला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी शासकीय निधीच्या चणचणीचे खापर थेट लाडकी बहीण योजनेवर फोडले.

    “निधी कमी पडतोय, आता मार्ग कसा काढायचा?”

    उदयनराजे भोसले म्हणाले की, “लाडकी बहीण योजना शासनाने राबवली, त्यामुळे राज्यावर आणि तिजोरीवर आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध विकासकामांसाठी सध्या अपेक्षित निधी पोहोचत नाहीये. अशा परिस्थितीत शहराच्या कामांचे नियोजन कसे करता येईल आणि यातून नेमका मार्ग कसा काढता येईल, याच धोरणात्मक विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही ही बैठक घेतली होती.”

    सावळागोंधळ खपवून घेणार नाही, अधिकाऱ्यांना ताकीद

    या बैठकीत दोन्ही राजे कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. पालिकेच्या चालू असलेल्या कामांमध्ये कुठलाही सावळागोंधळ किंवा ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा दोन्ही नेत्यांनी प्रशासनाला दिला. “अनेक नगरसेवक हे प्रथमच निवडून आले आहेत, त्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारी आणि विभागप्रमुखांनी त्यांना कामात पूर्ण सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन करावे,” अशा सक्त सूचनाही उदयनराजेंनी दिल्या.

    हॉकर्स झोन आणि अतिक्रमणावर अ‍ॅक्शन प्लॅन

    शहरातील वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी काही प्रमुख ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ उभारण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. “वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जनतेने आम्हाला मोठ्या अपेक्षेने निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची मुख्य जबाबदारी आहे,” असे सांगत प्रत्येक वॉर्डातील कामे गतीने मार्गी लावणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरील विधानाचीच सध्या राज्यभर सर्वाधिक चर्चा सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा