• Mon. Jun 15th, 2026
    Rohit Pawar : ‘हा जनता दरबार नव्हता’; बारामती दौऱ्यावर अखेर रोहित पवारांचे स्पष्टीकरण

    आमदार रोहित पवार यांनी शनिवारी बारामतीत नागरिकांसाठी वेळ दिला. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत, समस्या सोडण्याचा प्रयत्न केला. यावरुन रोहित पवार बारामतीत जनता दरबार घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या चर्चांवर अखेर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : “पेट्रोल-डिझेलचे दर सरकार ‘मेलोडी’ चॉकलेटप्रमाणे रोज थोडेथोडके वाढवत आहे. उद्या अचानक मोठी दरवाढ झाली तरी आश्चर्य वाटू नये”, असा टोला आमदार रोहित पवार यांनी बारामती दौऱ्यात बोलताना लगावला. इंधन दरवाढ, डिझेल तुटवडा, मराठा आरक्षण, ‘नीट’ प्रकरण तसेच महायुतीतील अंतर्गत संघर्ष अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. बारामतीतील भेटीगाठींबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, दरवर्षी प्रवेश प्रक्रियेच्या काळात ते बारामतीत असतात. शिक्षण संस्था, कुक्कुटपालन व्यवसाय तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी लोक त्यांना भेटत असतात. “हा जनता दरबार नव्हता, फक्त लोकांना भेटण्यासाठीची वेळ होती. माझ्या जनता दरबारात दोन हजारांहून अधिक लोक असतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यात जाणवत असलेल्या डिझेल तुटवड्यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “पेट्रोल पंप चालकांचा दोष नाही. त्यांनी आगाऊ पैसे भरूनही इंधन मिळत नाही. ही समस्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या पातळीवरच सुटू शकते,” असे ते म्हणाले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत डिझेलची कमतरता अधिक जाणवत असल्याचा दावाही त्यांनी केला. “निवडणुकीपर्यंत दरवाढ थांबते, तुटवडा होत नाही; पण निवडणूक संपताच परिस्थिती बदलते,” असा आरोप करत त्यांनी आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली.

    “भारत पेट्रोलियमसारख्या कंपन्या तेवीस हजार कोटी रुपयांचा नफा कमावत असताना सामान्य नागरिकांना महाग इंधन का घ्यावे लागते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, “मनमोहन सिंह यांच्या काळात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल एकशे दहा डॉलर असतानाही पेट्रोल साठ रुपयांच्या आसपास मिळत होते. आज त्याच दरात पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे.” गेल्या काही वर्षांत सरकारने सामान्य नागरिकांच्या खिशातून अतिरिक्त 10 लाख कोटी रुपये वसूल केल्याचा आरोपही त्यांनी केला.

    ‘2029 पूर्वी मोठी फाटाफूट होऊ शकते’, रोहित पवारांचा दावा

    विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत चढाओढ वाढेल, असे संकेत देताना रोहित पवार म्हणाले, “काही जण नाराज होतील, काही दिल्लीला जातील, काही साताऱ्याला जातील.” तर महाविकास आघाडीच्या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पवार यांनी भविष्यात मोठ्या राजकीय फाटाफुटीची शक्यता वर्तवली. “२०२९ पूर्वी बरंच काही घडू शकतं. विविध पक्षांचे अंदाजे चाळीस आमदार इकडेतिकडे जाऊ शकतात,” असे सूचक विधान त्यांनी केले.

    ‘रेड बर्ड कंपनीची चौकशी झाली पाहिजे’, रोहित पवारांची मागणी

    विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी विमान वाहतूक सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. “नियम सर्वांसाठी समान असावेत. भविष्यात मोठ्या किंवा सामान्य नागरिकांच्या विमानांबाबतही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कठोर धोरणाची गरज आहे,” असे ते म्हणाले. “नागरिकांची मागणी असल्यास रेड बर्ड कंपनीची चौकशी करावी”, अशी मागणीही त्यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा