• Sun. Jun 7th, 2026
    Amravati Crime: अमरावतीत डीजेवर नाचण्यावरुन लग्नात वाद; 28 वर्षीय युवकाला निर्घृणपणे संपवलं, भाऊ गंभीर

    Amravati Crime: लग्न समारंभात डीजेवर नाचताना झालेल्या क्षुल्लक वादात २८ वर्षीय युवकावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला.

    अमरावती क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.वृत्तसेवा, अमरावती: लग्न समारंभात डीजेवर नाचताना झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना अचलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. १० ते १२ जणांच्या टोळक्याने केलेल्या धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला, तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. राजेश सिंह बावरी (२८, रा. मोर्शी) असे मृतकाचे नाव असून, अशोक उर्फ गोलू सिंह बावरी (३२) हा गंभीर जखमी झाला आहे.

    मंगळवारी सकाळी परतवाडा येथे एका विवाह सोहळ्यात डीजेवर नाचताना धक्का लागल्याने दोन गटांत वाद झाला होता. हा वाद थेट परतवाडा पोलिस ठाण्यात पोहोचला, मात्र आपापसात तडजोड झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली नाही. परंतु, हा वाद पूर्णत: मिटला नव्हता तर त्याचा सूड घेण्याची तयारी दुसऱ्या गटाने केली होती. सायंकाळी राजेश आणि अशोक हे दोन्ही भाऊ दुचाकीने चांदूर बाजारमार्गे मोर्शीकडे निघाल्यानंतर, अचलपूर नाक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर मागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले.

    Maharashtra TimesCrime News: 19 वर्षीय विवाहित सुनेचा मृत्यू, सासऱ्याने वेगळाच बनाव रचला; दफन केलेली बॉडी उकरून बाहेर काढताच भांडाफोड!
    हल्लेखोरांनी आधी लोखंडी सळईने राजेशच्या डोक्यावर प्रहार करून त्याला खाली पाडले आणि नंतर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या अशोकवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोघांना तातडीने आधी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला. या हल्ल्यादरम्यान देशी कट्ट्यातून फायरिंग झाल्याचीही चर्चा आहे.

    Maharashtra TimesAmravati Politics: दावेदारीने भाजपची डोकेदुखी; अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारीसाठी ‘त्रिकोणी’ शर्यत
    अचलपूर पोलिसांनी बिजल सिंह बावरी, वीरू सिंह बावरी, नाना सिंह बावरी, अमर सिंह बावरी, कालू सिंह बावरी, चरण सिंह बावरी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा