• Sat. Jun 6th, 2026

    मुंबईत नदी आणि जमिनीखालून धावणार बुलेट ट्रेन; विक्रोळी ते बीकेसी भुयारी मार्ग, खोदकामाला लवकरच सुरुवात

    मुंबईत नदी आणि जमिनीखालून धावणार बुलेट ट्रेन; विक्रोळी ते बीकेसी भुयारी मार्ग, खोदकामाला लवकरच सुरुवात

    Bullet Train Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहराच्या खालून धावणार आहे. यासाठी घणसोली ते शिळफाटादरम्यान बोगद्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या भुयाराचं खोदकाम आता सुरू होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी मुंबई शहरातील भुयारी मार्गाच्या खोदकामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. टनेल बोरिंग मशीनचा तब्बल ३५० टन वजनाचा पहिला कटरहेड यशस्वीपणे विक्रोळीतील शाफ्टमध्ये उतरवण्यात आला आहे. ‘टीबीएम’च्या मुख्य शिल्ड जोडणीतील हा अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा आहे. जोडणी पूर्ण झाल्यानंतर भुयाराच्या प्रत्यक्ष खोदकामाला प्रारंभ होईल. देशात प्रथमच एवढ्या मोठ्या क्षमतेच्या ‘टीबीएम’च्या मदतीने रेल्वे बोगद्यासाठी खोदकाम होणार आहे.

    घणसोली ते शिळफाटा खोदकाम पूर्ण

    बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबईतील २१ किमी भुयारी मार्गासाठी ‘टीबीएम’ आणि ‘एनएटीएम’ (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) यांचा वापर करण्यात येत आहे. ‘एनएटीएम’ने घणसोली ते शिळफाटादरम्यान ४.८ किमीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. विक्रोळी ते वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) बुलेट स्थानकापर्यंतचे खोदकाम ‘टीबीएम’ने पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कटरहेड विक्रोळी शाफ्टमध्ये उतरवण्यात आला आहे.Maharashtra TimesIndia’s First Bullet Train: फक्त 2 तासांत मुंबई ते अहमदाबाद, 320चा वेग, महाराष्ट्रात 4 थांबे; भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

    कटरहेड आणि ‘टीबीएम’ची जोडणी पूर्ण झाल्यावर विक्रोळीच्या ५६ मीटर खोलीवरून बीकेसीपर्यंत ५.८ किमीपर्यंत खोदकाम सुरू करण्यात येईल. ‘बीकेसी’ची खोली रस्ते सपाटीपासून ३६ मीटरपर्यंत असणार आहेत. शहरी भाग आणि मिठी नदीखालून खोदकाम करण्यात येणार आहे. बुलेटच्या भुयाराचे खोदकाम करताना परिसरातील इमारती, रस्ते आणि जमिनीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक देखरेख प्रणाली वापरण्यात येत आहे. यात ‘सरफेस सेटलमेंट पॉइंट्स’ (एसएसपी), ‘ऑप्टिकल डिस्पेल्समेंटर सेंसर’, ‘टिल्ट मीटर’, ‘थ्री डी, टार्गेटेस’, ‘स्ट्रेन गेज’ आणि ‘सिस्मोग्राफ’ अशा उपकरणांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या(एनएचएसआरसीएल) अधिकाऱ्यांनी सांगितले.

    ‘टीबीएम’ने असे होते खोदकाम…

    जमिनीखाली बोगदा खणण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे ‘टीबीएम’. ‘टीबीएम’च्या पुढील भागात सतत फिरणारे कटरहेड बसवले जाते. त्यात असलेले ‘कटिंग डिस्क’ खडक व माती कापण्याचे काम करून मार्ग तयार करते. माती-दगड ‘स्क्रेपर्स’च्या मदतीने साफ केले जाते. ‘बकेट लिप्स’च्या मदतीने हा राडारोडा चेंबरमध्ये जमा होतो. पाइपलाइन आणि ‘कन्व्हेयर’ प्रणालीतून राडारोडा बोगद्याबाहेर आणला जातो. एकीकडे हे काम सुरू असताना टीबीएमच्या मागील बाजूने काँक्रीट रिंग बसवून बोगद्याची भिंत तयार केली जाते. त्यामुळे बोगद्याचे खोदकाम आणि काँक्रिटीकरणाचे काम वेगाने आणि सुरक्षितपणे होते. दाट लोकवस्ती असलेल्या शहराखाली तसेच, संवेदनशील परिसरात काम करताना टीबीएम विशेष प्रभावी ठरते.

    Maharashtra TimesBandra Demolition: गरीब नगरमधील कारवाईचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा; 50 नव्या एक्सप्रेस ट्रेन, वांद्रे टर्मिनसचा कसा होणार विस्तार?

    कटरहेडची वैशिष्ट्ये

    १३.६ मीटर व्यास -अप आणि डाउन अशा दोन्ही बुलेट मार्गांसाठी एकाच मोठ्या बोगद्याचे खोदकाम-वजन तब्बल ३५० टन ( जवळपास २५० मध्यम आकाराच्या एसयूव्ही गाड्यांच्या वजनाएवढे)
    पाच स्वतंत्र भागांमध्ये विक्रोळी साइट्सवर आणले- एक हजार सहाशे किलो उच्च-प्रिसिजन वेल्डिंगच्या मदतीने जोडणी
    युनिटमध्ये ८४ ‘कटिंग डिस्क’, १२४ ‘स्क्रेपर्स’ आणि १६ ‘बकेट लिप्स’चा समावेश

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा