• Tue. Jun 9th, 2026
    Raj Thackeray : हाच दिवस तत्सम समूहाचा असता तर गालिचे अंथरले असते; हुतात्मा स्मारकाच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप

    Raj Thackeray Post On Maharashtra Din: महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षाचा विसर पडतोय का? असा सवाल करत त्यांनी मराठी माणसालाही साद घातली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मात्र, यावेळी स्मारकाची अवस्था पाहून राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “हा दिवस सरकारी औपचारिकता म्हणून साजरा केला जात असून, स्मारकाबाबत सरकारची अनास्था स्पष्टपणे जाणवत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकारसोबतच राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारक हे तीर्थक्षेत्रासारखे असायला हवे, तिथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी दिसायला हव्यात, पण मराठी माणसाच्या मनात ही अनास्था का निर्माण झाली आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

    राज ठाकरे यांची पोस्ट जशास तशी

    सस्नेह जय महाराष्ट्र,सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

    दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

    हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.

    Maharashtra TimesMaharashtra May Heat Update : ‘मे हिट’मध्ये ऊन-पावसाचा थरार; पुणे-मुंबईत पारा 40 पार, तर ‘या’ ठिकाणी वरुणराजा बरसणार, पुढचे 48 तास महत्त्वाचे

    पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?

    वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.

    मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?

    बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून परदेशभरारी! मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा; दररोज 35 उड्डाणं

    पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.

    माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.

    मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील.

    राज ठाकरे

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा