संजय राऊत यांनी नवदाम्पत्याला पुष्पगुच्छ देत वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राऊत यांचा व्यासपीठावर म्हस्के यांनी शाल व पुष्पगुच्छ देत सन्मान केला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले.
विनित जांगळे, ठाणे: दोघे कट्टर राजकीय विरोधक… शिवसेनेतील फुटीनंतर दिवसागणिक एकमेकांवर सोडले जाणारे धारदार टीकेचे बाण, अशी ओळख असलेल्या शिवसेनेतील दोघा फायरब्रॅण्ड नेत्यांनी काही काळासाठी राजकीय शत्रुत्व दूर ठेवले. निमित्त होते, विवाह सोहळ्याचे. शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला शिवसेना (उबाठा) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी हजेरी लावली. यावेळी राऊत यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावर म्हस्के यांनी राऊत यांचा सन्मान केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदारांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या विवाहसोहळ्यात राऊत यांची भेट लक्षणीय ठरली.
कितीही टोकाचे मतभेद असले तरी, कौटुंबिक नातेसंबंध राखण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी ठाण्यात आला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचे सुपुत्र उद्योजक आशुतोष म्हस्के यांचा हर्षदा यांच्याशी विवाह संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभ सोहळ्याला संजय राऊत यांनी हजेरी लावली. शिवसेनेतील फुटीनंतर नरेश म्हस्के यांच्याकडे शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आली. या माध्यमातून त्यांनी नेहमीच शिवसेनेवर (उबाठा) टीकेची तोफ डागली. अनेकदा म्हस्के यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीकेची बाण सोडले. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून राऊत यांनी म्हस्के यांना लक्ष्य केले. मात्र म्हस्के यांच्या मुलाच्या लग्नामध्ये राऊत यांची एण्ट्री होताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
शिंदेंचे शिलेदार राऊतांच्या स्वागताला
दोन्ही शिवसेनेचे राजकीय मार्ग स्वतंत्र झाल्यानंतर विविध वादाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी राऊत यांच्याविरोधात ठाण्यात उग्र आंदोलन केले. ठाण्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या टेंभी नाक्यावर राऊत यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करत त्यांना ठाण्यात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र तेच पदाधिकारी राऊत यांच्या स्वागताला या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हजर होते. याप्रसंगी शिवसेनेचे ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी राऊत यांना स्वागत समारंभाच्या व्यासपीठावर आणले. पवार यांनीही आस्थेने राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करत हात धरून गर्दीतून वाट काढत व्यासपीठावर नेले. राजकीय मतभेद कितीही असले तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असून राऊत यांनी अगदी मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधल्याचे पवार यांनी नमूद केले.
दिग्ग्ज नेत्यांची मांदियाळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, उदय सामंत, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, राज्यसभेचे खासदार रामदास आठवले, भाजप आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय व पोलिस अधिकारी, कलाकारांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा