Pune-Mumbai Expressway Traffic: वीकेंड आला की मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी होते. नव्या मिसिंग लिंकमुळे ही कोंडी बायपास करून प्रवास करता येणार असतानाच एमएसआरडीसी अजून एका प्रकल्पाचं काम सुरू करणार आहे.
खालापूर टोल नाक्याजवळ कोंडी
खोपोली ते कुसगावदरम्यान 13.3 किमी मिसिंग लिंकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 1 मे रोजी लोकार्पण झालं. लोणावळा-खंडाळा घाटातील कोंडी बायपास करून मुंबई-पुणे प्रवास यामुळे सुलभ होणार आहे. दररोज या महामार्गावरू तब्बल 1.5 वाहनांचा प्रवास होते. वीकेंडला ही संख्या आणखी वाढते. शुक्रवारीच लॉन्ग वीकेंड आणि मिसिंग लिंकच्या उद्घाटनासाठी एक लेन बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल 8 तास प्रवासी खालापूर टोल नाक्याजवळ अडकले होते.
Mumbai-Pune Missing Link: देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावर भव्य प्रकल्प, ‘मिसिंग लिंक’ म्हणजे नेमकं काय? मार्गाची वैशिष्ट्येही आहेत अनेक
दोन दशकांपूर्वी एक्सप्रेस वे सुरू
2002मध्ये 94.6 किमी लांब मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची सुरूवात झाली होती. हा देशातील सर्वात पहिला द्रुतगती महामार्ग आहे. तेव्हापासून दोन दशकांमध्ये खासगी वाहनांची संख्या वाढली असून वाहतूक कोंडी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासात वेळ वाढतो. या समस्येवर मिसिंग लिंकचा तोडगा निघाला होता. नवीन मार्ग आठ पदरी असून जुना द्रुतगती महामार्ग सहा पदरीच आहे. यामुळे भविष्यात होणारी कोंडी टाळण्यासाठी हा महामार्गसुद्धा दहा पदरी करणं आवश्यक ठरणार आहे.
त्यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाजही हळूहळी वाढत आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेवरून या विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांची संख्या वाढणार आहे. खासगी वाहनांची संख्या यामुळे वाढणार आहे. त्यामुळे महामार्गचं रुंदीकरण गरजेचं आहे.
कसा असेल दहा पदरी मार्ग?
या संपूर्ण प्रकल्पासाठी 5,000 कोटी रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे. सध्या एक्सप्रेसवेच्या बाजूने 100 हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या जमीन संपादनात कोणताही अडथळा येणार नसल्याची अधिकाऱ्यांची आशा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होताच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं दहा पदरीकरण सुरू होणार आहे.
Khambatki Ghat Tunnel: नव्या बोगद्याने 5-10 मिनिटांत ओलांडा खंबाटकी घाट! धोकादायक वळणांतून सुटका; पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा
एक्सप्रेस वेची गरज का होती?
मुंबई आणि पुण्याला जोडणारा दोन पदरी राष्ट्रीय महामार्ग -4 प्रवाशांना अपुरा पडत होता. तसेच, हा 192 किमी लांब रस्ता डोंगराळ भागातून जात असल्यामुळे प्रवासात वेळ जायचा. या नंतर 94 किमी लांब स्वतंत्र एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अवघ्या 27 महिन्यांत हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात आला. या मार्गावर 17 व्हायाडक्ट, 26 अंडरपास, दोन रेल्वे ओव्हर ब्रिज आणि एका 5.7 किमी लांब बोगद्याचा समावेश होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गसुद्धा चौपदरी करण्यात आला.
सहा पदरी द्रुतगती महामार्ग आणि चौपदरी राष्ट्रीय महामार्ग खालापूर टोलनाक्याजवळ एकत्र येऊन ते खंडाळा एक्झिटजवळ जाऊन वेगळे होतात. या दहा पदरी रस्त्यावरील वाहतूक पुढे आडोशी बोगद्यापासून खंडाळ्याबाहेर एका 6 किमी अरुंद मार्गावर पोहोचते. त्यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते.
