• Sun. Sep 6th, 2026
Pune News : L&T चा विक्रम मोडला! पुण्याच्या PMRDA चा मोठा कारनामा; 95 दिवसांत 14 मजली इमारत उभारली ऐतिहासिक कामगिरीची जगानं दखल घेतली

PMRDA ने चिखलीत अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव कोरलं आहे. एल अँड टीचा विक्रम मोडीत काढत रचलेल्या या नव्या इतिहासाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

पुण्यात ९५ दिवसांत १४ मजली इमारत बांधली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: आपल्याकडे म्हणतात ना, ‘पुणे तिथे काय उणे!’ आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात आला आहे. साधारणपणे एक घर बुक केल्यावर त्याचा ताबा कधी मिळेल, या प्रतीक्षेत ग्राहकांचे डोळे थकतात. मे महिन्याचा ताबा नोव्हेंबरपर्यंत जातो आणि कधी कधी वर्षही उलटतं. पण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( PMRDA ) या सर्व प्रश्नांना छेद देत एक असा चमत्कार करून दाखवलाय, ज्याची चर्चा आता संपूर्ण आशिया खंडात होत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात केवळ ९५ दिवसांत १४ मजली इमारत यशस्वीरित्या उभी करून PMRDA ने नवा इतिहास रचला आहे.

अशक्य ते शक्य केलं!

कुठलीही बहुमजली इमारत उभी राहायला किमान वर्ष-दोन वर्ष लागतातच. पण चिखलीतील सेक्टर १२ मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) उभारलेली ही ‘D-3’ इमारत अवघ्या तीन महिन्यांच्या थोड्या-अधिक कालावधीत दिमाखात उभी राहिली आहे. सुमारे ९४,७२२ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीत ११२ सदनिका (2 BHK) आहेत. विशेष म्हणजे, या कामगिरीमुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये महाराष्ट्राच्या नावाचा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Maharashtra TimesSupriya Sule : ‘हा दिवस येईल वाटलं नव्हतं, वहिनींना साथ द्या, दादाला…’; बारामतीतील प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला

नेमकं कसं घडलं हे वेगवान काम?

ही वेगवान कामगिरी काही जादू नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सुमारे ९ हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये ‘३-एस प्रीकास्ट आरसीसी’ (Safety, Strength, Speed) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सोप्या भाषेत सांगायचं तर, भिंती आणि स्लॅब यांसारखे घटक कारखान्यात आधीच तयार केले जातात आणि साईटवर आणून ते एखाद्या ‘पझल’सारखे एकमेकांना अचूक जोडले जातात. यामुळे बांधकामाचा वेळ वाचतो आणि मजबुतीही कायम राहते.

गुणवत्तेशी तडजोड नाही

वेगवान काम म्हणजे दर्जा निकृष्ट असेल का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितलं की, PMRDA ने स्वतःचाच १०० दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढताना घराची सुंदरता आणि मजबुतीकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. यापूर्वी एल अँड टी कंपनीच्या नावावर ९६ दिवसांत १२ मजली इमारत उभारण्याचा विक्रम होता, तो आता इतिहास जमा झाला आहे.

विक्रमी इमारतीची सर्व ठोक माहिती

इमारत: १४ मजली (D-3)
क्षेत्रफळ: ९४,७२२ चौरस फूट
फ्लॅट्स: ११२ (2 BHK)
वेळ: अवघे ९५ दिवस
तंत्रज्ञान: प्रीकास्ट आरसीसी (3-S System)

सरकारी गृहप्रकल्प म्हणजे ‘रखडलेले’ ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरले आहे. या कामगिरीमुळे पुणेकरांना आणि महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा