Nanded Crime News : नांदेडमधील खळबळजनक तिहेरी हत्याकांड आणि गँगवार प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख उर्फ कबुतरला पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. वेशभूषा बदलून राहणाऱ्या या आरोपीने पोलिसांना खुले आव्हान दिले होते.
गँगवार प्रकरणातील फरार आरोपी कबूतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड: नांदेडमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून झालेल्या गँगवार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेतील फरार असलेला ‘साईलाला’ गँगचा आरोपी शाहरुख उर्फ कबुतर आणि त्याचा अन्य एक सहकारी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. मागील पंधरा दिवसांपासून तो फरार होता. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी तो हैदराबादमध्ये वेशभूषा बदलून राहत होता. “मी कबुतर आहे, गुन्हा केल्यानंतर पळून जातो” असे आव्हान त्याने पोलिसांना दिले होते; मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
नेमकी घटना काय होती?
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ई-स्क्वेअर कॅनॉल रोड परिसरात ४ एप्रिल रोजी मध्यरात्री ‘साईलाला’ आणि ‘सदा’ गँगच्या सदस्यांमध्ये गँगवार झाले होते. चित्रपट पाहून परत जात असताना सदा गँगच्या अर्जितसिंह चव्हाण याच्यावर साईलाला गँगच्या सदस्यांनी पाळत ठेवून हल्ला केला. या हाणामारीत अर्जितसिंह चव्हाण आणि महम्मद अरबाज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, जखमी झालेल्या सय्यद आवेज याची अर्जितसिंहच्या भावाने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
तिहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले
या गँगवारमुळे झालेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण नांदेड शहर हादरून गेले होते. पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल करून दोन्ही गँगच्या सदस्यांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते. मात्र, साईलाला गँगचा मुख्य आरोपी शेख शाहरुख उर्फ कबुतर फरार होता.
Devendra Fadanvis : ‘शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींना पूर्ण समर्थन दिले, मला फोन…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभेत माहिती
तो हैदराबादमध्ये आपल्या सहकाऱ्यासोबत ओळख लपवण्यासाठी वेशभूषा बदलून राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तसेच, आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या इतर दोघांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पोलिसांचे स्पष्टीकरण
आरोपी ‘कबुतर’वर दहाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून तो साईलाला गँगचा सक्रिय सदस्य आहे. ही घटना निव्वळ टोळी वर्चस्वाच्या लढाईतून घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, “नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढली असून ते गुन्हेगारीचे हब बनले आहे,” असे खोटे नरेटिव्ह पसरवून शहराची बदनामी केली जात असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात नांदेडमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा