• Sat. Jun 6th, 2026

    Latur Crime : नवऱ्याच्या प्रेयसीवर सूड उगवण्यासाठी सख्ख्या चुलतीनेच पुतण्याला संपवलं; लातूरमधील अपहरण प्रकरणामागचा खळबळजनक तपशील समोर

    Latur Crime : नवऱ्याच्या प्रेयसीवर सूड उगवण्यासाठी सख्ख्या चुलतीनेच पुतण्याला संपवलं; लातूरमधील अपहरण प्रकरणामागचा खळबळजनक तपशील समोर

    Crime News : लातूरच्या चाकूरमधील ७ वर्षांच्या देवांश स्वामीच्या खुनाबद्दलची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी सख्या चुलतीनेच पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी महिला अनिता स्वामीला अटक केली आहे.

    आरोपी महिला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी, १९ एप्रिल रोजी एका सात वर्षांच्या चिमूरड्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सख्या चुलतीनेच सात वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    अनैतिक संबंधातून सूडाचा प्रवास

    आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि तिला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी आरोपीने स्वतःसह दिराच्या मुलांचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. याच रागातून तिने आपल्या सात वर्षीय पुतण्याचा खून केला आणि तो आरोप पतीच्या प्रेयसीवर लावून तिला अडकवण्याचा कट रचला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने तिने पुतण्याचा मृतदेह एका पडक्या वाड्यात टाकून दिला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    खेळायला गेलेली मुले परतलीच नाहीत

    रविवारी (१९ एप्रिल) चाकूर येथील साईचरण दिनेश स्वामी (वय १०) व देवांश मंगेश स्वामी (वय ७) हे दोन सख्खे चुलत भाऊ सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. यामुळे फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी पोलिसांना मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली. यावरून पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध सुरू केला. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळील उजळंब रोड परिसरातील एका पडक्या जागेत, ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश स्वामी याचा मृतदेह आढळून आला.

    Maharashtra TimesDevendra Fadanvis : ‘शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींना पूर्ण समर्थन दिले, मला फोन…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभेत माहिती​

    तपासाचा छडा

    घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी वेगाने तपास सुरू केला. यावेळी फिर्यादीची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले.

    घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे, साधारण दोन-अडीच तास ती घराबाहेर असणे आणि चौकशीदरम्यान विसंगत माहिती देणे, यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून विचारपूस केली असता तिने गुन्हा कबूल केला.

    पाच दिवसांची पोलीस कोठडी

    याप्रकरणी पोलिसांनी अनिता स्वामी हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात तिला आणखी कोणी सहकार्य केले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या हत्याकांडात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    या कारवाईत पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा