• Sat. Jun 6th, 2026
    Nashik Crime: तोंड झाकून महिला घरी आली, उकळतं तेल 20 वर्षीय तरुणीच्या अंगावर फेकलं; स्कार्फ काढताच सर्वांनाच धक्का

    Nashik Crime News: नाशिकमधील म्हसरूळ परिसरातील यशोदानगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली.

    नाशिक क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, नाशिक: कौटुंबिक वादातून एका ३६ वर्षीय महिलेने अवघ्या २० वर्षीय विवाहित सुनेवर उकळते तेल फेकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या भीषण हल्ल्यात सून ३० टक्के भाजली असून, परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

    म्हसरूळ येथील मेहेरधाम भागातील यशोदानगर परिसरात ज्ञानेश्वरी राहुल गिरी (वय २०) या सासू पद्मा यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. शुक्रवारी (दि. १०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या सासू घरात जेवण करीत असताना दरवाजाची बेल वाजली. ज्ञानेश्वरी यांनी दरवाजा उघडला असता समोर तोंडाला स्कार्फ बांधलेली एक अनोळखी महिला उभी होती. त्या महिलेने खोटी ओळख सांगितली. ‘मी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या गोसावींची पुतणी आहे. गॅस संपला असून, पापड बनवण्यासाठी थोडे तेल गरम करून द्या’, अशी विनंती केली.

    Maharashtra TimesNashik News: नाशकात 22 वर्षीय परिचारिकेचं टोकाचं पाऊल; रुग्णालयाच्या निवासस्थानात दिला जीव
    ज्ञानेश्वरी यांनी शेजारधर्म आणि माणुसकीच्या नात्याने त्या महिलेला मदत करण्याचे ठरवले. त्यांनी महिलेकडून तेलाचे पातेले घेतले आणि स्वयंपाकघरात नेऊन तेल गरम करून दिले. मात्र, ‘तेल अजून हवे तसे कडक झाले नाही’, असे सांगून त्या संशयित महिलेने पुन्हा तेल गरम करण्यास भाग पाडले. ज्ञानेश्वरी दुसऱ्यांदा तेल कडक करून त्या महिलेला देण्यासाठी आल्या. त्या महिलेने अचानक तेलाच्या पातेल्याला खालून जोरात धक्का दिला. त्यामुळे उकळते तेल ज्ञानेश्वरी यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर उडाले. एवढ्यावरच न थांबता, त्या महिलेने ज्ञानेश्वरी यांचा गळा दाबून त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न केला.

    घरात सुरू असलेला हा थरार पाहून ज्ञानेश्वरी यांच्या सासूने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावून आले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या महिलेला नागरिकांनी जागीच पकडले. जेव्हा तिचा स्कार्फ काढण्यात आला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. ती महिला अज्ञात नसून, ज्ञानेश्वरी यांची मावस सासू यशोदा ज्ञानेश्वर गोसावी (वय ३६, रा. पिंपळगाव बसवंत) असल्याचे निष्पन्न झाले.

    Maharashtra TimesNashik Accident: जागरण-गोंधळावरुन परतताना काळाचा घाला! पिकअपने घेतला पेट; नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू, 7 जण जखमी
    घटनेची माहिती मिळताच ‘डायल ११२’ चे पथक आणि उपनिरीक्षक क्षीरसागर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर भाजलेल्या ज्ञानेश्वरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी या सुमारे ३० टक्के भाजल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्हसरूळ पोलिसांनी संशयित यशोदा गोसावीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. हा हल्ला नेमक्या कोणत्या जुन्या वादातून किंवा रागातून करण्यात आला, याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा