• Sat. Jun 6th, 2026

    समृद्धी महामार्ग अपघातातील आठ मृतांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 8, 2026
    समृद्धी महामार्ग अपघातातील आठ मृतांच्या कुटुंबियांना ४० लाखांची मदत – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दि. १ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला. सदर घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख प्रमाणे एकूण रुपये ४० लाख इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम जिल्हाधिकारी, जालना यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

    अपघात जालना शहरालगतच्या कडवंची गावाजवळ सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींवर जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मृतांमध्ये लक्ष्मीबाई संतोष मदन, कडुबाई रामदास मदन, ताराबाई गहेनाजी चौधरी, मंगलाबाई प्रकाश सिनगारे, सुमनबाई कचरू अदमाने, अलकाबाई दादाराव अदमाने, मिनाबाई परमेश्वर अदमाने व कांचनबाई प्रकाश अदमाने यांचा समावेश आहे.

    घटनेची माहिती प्राप्त होताच समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षामार्फत तात्काळ आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पाठविण्यात आल्या. रुग्णवाहिका व पोलीस यांच्या समन्वयातून जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    प्राथमिक तपासात संबंधित ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

    या प्रकरणी मृतांच्या वारसांची पडताळणी करून मंजूर मदत तातडीने वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश देण्यात आले आहेत.

    समृद्धी महामार्गावर घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन मृतांच्या कुटबियांना मदत देण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. शिवाय, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत तातडीने मिळावी, यासाठीही प्रशासनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. गरजू नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी बाबत अधिक माहितीसाठी व मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष यांनी कळविले आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed