• Sat. Jun 6th, 2026
    Rahuri Politics: भाजपचा पवारांना धक्का! तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, ‘राष्ट्रवादी’कडून गोविंद मोकाटे रिंगणात

    Rahuri Bypoll Election 2026: देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या एका फोन कॉलने तनपुरे यांचे मन वळवल्याचे समजते.

    राहुरी पोटनिवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राहुरीत भाजपने धक्का दिला. राष्ट्रवादी (शप) उमेदवार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना गळाला लावून भाजपने राहुरीची पोटनिवडणूक एकतर्फी केली.

    त्यामुळे राष्ट्रवादीला (शप) ऐन वेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. दरम्यान, तनपुरेंच्या निर्णयाने भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

    Maharashtra TimesSharad Pawar : बारामतीत काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते ठाकरेंना विधान परिषदेत पाठिंबा, शरद पवार रोखठोक बोलले
    भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे २३ एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित मनाली जात होती. तनपुरे यांच्याकडे राजकारणाचा दीर्घ अनुभव असून, त्यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. त्यामुळे भाजपचे पाठबळ असूनही अक्षय कर्डिले यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकाळी तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. या भेटीत चव्हाण आणि विखे-पाटील यांनी मोबाइलवरून तनपुरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले.

    सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात तनपुरे यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. तसेच डबघाईला आलेल्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या पुनुरुज्जीवनासाठी तनपुरेंना राज्य सरकारची मदत हवी असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याच्या प्रकरणात मदत करण्याचा शब्द दिल्यानंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते

    Maharashtra TimesSunetra Pawar : ‘मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी’; सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
    ‘दुटप्पीपणाचा आरोप निरर्थक’
    मुंबई : प्राजक्त तनपुरे यांनी ऐन वेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने गोविंदराव मोकाटे यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. ‘अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत उमेदवार द्यायचा नाही, हे पक्षाने जाहीर केले होते; परंतु राहुरीबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे बारामती आणि राहुरीबाबत पक्षाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप निरर्थक आहे,’ असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे केवळ राहुरीपुरते नाही, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठीसुद्धा फोन करून लोकांना आश्वासने देत असतात, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. अशोक खरातप्रकरणी सीडीआर कसा मिळाला, याबाबत माहिती देण्यासाठी अंजली दमानिया यांनी दिलेले चहापानाचे निमंत्रण स्वीकारणार असल्याचेही ते म्हणाले.

    तालुक्यातील प्रश्नांसाठी निवडणूक लढवायची होती. मात्र, भाजपने पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. राहुरीतील रस्त्यांची समस्या, एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. – प्राजक्त तनपुरे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा