• Fri. Jul 24th, 2026

    Monsoon Tourism: पर्यटक! छे… नुसती बेशिस्त झुंड; वर्षासहलींच्या नावाखाली सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटनस्थळी धुडगूस, कारवाई कधी होणार?

    Monsoon Tourism: पर्यटक! छे… नुसती बेशिस्त झुंड; वर्षासहलींच्या नावाखाली सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटनस्थळी धुडगूस, कारवाई कधी होणार?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या दोन आठवड्यांपासून शनिवार-रविवारी पुण्याजवळील सर्व वर्षा सहलींच्या परिसरात तासन् तास वाहतूक कोंडी, बेशिस्त पर्यटन आणि प्रशासकीय यंत्रणेची अनुपस्थिती असे चित्र आहे. धबधब्यांच्या परिसरात, रानवाटांवर, घाटांत गाड्या थांबवून, स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून उपद्रवी लोक दारूपार्ट्या करीत आहेत. मात्र, या तळीरामांवर स्थानिक वनाधिकारी आणि पोलिसांकडून कारवाई झालेली नाही.

    सिंहगड, राजगड, लोणावळा परिसर, ताम्हिणी परिसरात गेल्या आठवड्यात गर्दी होती. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कोठेही नव्हती. मुख्य रस्त्यांवर काही भागांत पोलिसांचा बंदोबस्त होता; पण गर्दीच्या तुलनेत त्यांची संख्या तोकडी होती. पर्यटकांच्या या बेशिस्तीचा फटका सर्वांनाच बसला.
    Pune News : पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत
    दर वर्षी वर्षा सहलींची संख्या वाढते आहे. अतिधाडसातून होणाऱ्या अपघातांचे, पर्यटकांच्या मृत्यूचेही आकडे वाढत आहेत; तरीही प्रशासन पावसाळी पर्यटन व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहत नाही. यंदा जून कोरडा गेल्याने पर्यटनावर चर्चाच झाली नाही. धोकादायक धबधबे आणि पर्यटनस्थळी बंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जुलैमध्ये घेतला. या आदेशाचे पालन होते, की नाही याची पाहणीच झालेली नाही. परिणामी, पर्यटकांचा मुक्त संचार सुरू आहे.

    ‘अमका किल्ला वन विभागाच्या हद्दीत येतो’, ‘हा दुर्ग पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणात आहे,’ ‘ती ग्रामीण पोलिसांची हद्द आहे,’ अशा सबबी सांगून जबाबदारी ढकलणाऱ्या सरकारी विभागांमुळे यंदाही गर्दीने उच्चांक गाठला. स्थानिक संघटना, दुर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या मदतीने कोंडी सोडवली जात आहे.

    पोलिसांच्या उपस्थितीनंतर बदलले चित्र
    देवकुंड धबधबा आणि ताम्हिणी परिसरातील धबधब्यांकडे जाण्यासाठी बंदी असतानाही दहा दिवसांपूर्वीपर्यंत पर्यटकांची वर्दळ होती. मुख्य रस्ते सोडून पर्यटक इतर आडवाटांमार्गे धबधब्यांपर्यंत जात होते. गेल्या आठवड्यात तेथे दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी गावकऱ्यांची बैठक घेतली. ‘बंदी असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना मदत करू नये. कोणी तिकडे जाताना दिसल्यास त्यांना रोखावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या,’ अशी माहिती सागर दहिंबेकर यांनी दिली.

    सातत्याने गर्दी होणारी ठिकाणे
    सिंहगड, लोहगड, राजगड, भोर-वेल्हे, रायरेश्वर पठार, पाबे घाट, मुळशी-ताम्हिणी, लोणावळा, राजमाची

    Maharashtra TimesPune News : ‘आईssबाबाss’; कुटुंबासोबत गाढ झोपेत, भल्या पहाटे बिबट्याची झडप, आई-बापासमोर चिमुकलीला शेतात ओढलं; पुण्यात लेकीचा करुण अंत
    गर्दीची उदाहरणे
    -गेल्या रविवारी सिंहगडावर २० हजारांवर पर्यटक; घाटात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
    -भुशी डॅम, मुळशी भागात पर्यटकांनी बेशिस्तपणे लावलेल्या गाड्यांमुळे काही तास वाहतूक कोंडी
    -राजगड, लोणावळ्याजवळचे धबधबे या परिसरातही पर्यटकांची प्रचंड गर्दी

    सुट्टीदिवशी लोणावळ्याच्या मुख्य बाजारपेठेत आणि भुशी धरण परिसरातील पर्यटकांची गर्दी आणि वाहनांची कोंडी आवरताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडते. त्यामुळे आमच्या संस्थेने स्वयंसेवकांचा मोठा गट तयार केला आहे. त्यांना पर्यटन व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी त्यांचा मोठा उपयोग होतो.- सुनील गायकवाड, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, लोणावळा

    देवकुंड धबधब्याच्या परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर पर्यटकांचा उपद्रव थांबला आहे. –सागर दहिंबेकर, सह्याद्री वन्य जीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, वन्य जीव रक्षक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed