Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाचा विकास होणार आहे. चार फलाटांचा विस्तार सुरू असून नवे सहा फलाटही उभारण्यात येणार आहेत. अमृत भारत स्टेशन अंतर्गत सध्या 20 रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे. त्या अंतर्गत पुणे रेल्वे स्थानकाचाही विस्तार होणार आहे.
पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत रिमॉडलिंगच्या कामाची माहिती दिली. रिमॉडलिंगचे काम पूर्ण केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसराचा विकास केला जाणार असून, त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे, असे वर्मा यांनी सांगितले. या वेळी पुणे रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक पाठक, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा आदी उपस्थित होते.
Panvel Railway Station: ‘एसी’मुळे सामान्य लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, पनवेल रेल्वे स्थानकावरील भार वाढला; दररोज प्रवाशांची गर्दी
कसा होणार विस्तार?
पुणे रेल्वे विभागात सध्या १७०० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. त्यामध्ये खडकी, हडपसर टर्मिनलचा विकास केला जात असून, त्यासाठी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे; तसेच रिमॉडलिंग आणि नवीन सहा फलाटासाठी ४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रिमॉडलिंगचे काम सुरू झाले असून, ते टप्प्या-टप्प्याने केले जाणार आहे. यामध्ये सध्या असलेल्या चार फलाटांचा विस्तार आणि सहा नवीन रेल्वे फलाटांचे काम केले जाणार आहे. हे काम पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाचा आजूबाजूचा परिसर विकसित केला जाणार आहे. त्याचा सर्व आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; तसेच २० रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत विकास केला जात आहे. बीड-वडवणी नवीन मार्ग आणि चार स्थानके मंजूर झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रवासी सुरक्षेवर भर
प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने पुणे स्थानकावर १६० उच्च दर्जाचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुणे विभागातील इतर स्थानकांवरही ३८२ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवले आहेत. विविध सुरक्षा मोहिमांतर्गत हजारो जणांवर कारवाई करण्यात आली असून, चोरी, फेरीवाले आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासह नवीन लाइन आणि स्थानकांची उभारणीही करण्यात आली आहे; तसेच ‘कवच’ सुरक्षा प्रणालीच्या अंमलबजावणीतही प्रगती झाली असून, सध्या अनेक ठिकाणी काम सुरू आहे. एकूणच महसूल वाढ, प्रवासी सेवा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा या सर्व बाबींमध्ये पुणे रेल्वे विभागाने संतुलित प्रगती साधल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
Jogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी एक वर्ष, 4 प्लॅटफॉर्मसह मिळणार मेट्रो, रेल्वेची जोडणी; मुंबईकरांना चौथ्या टर्मिनसची प्रतीक्षा
महसूलात साडेतीन टक्क्यांनी वाढ
पुणे रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष (२०२५-२६) मध्ये सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करीत एकूण दोन हजार २३८ कोटी महसूल मिळवला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ३.७टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे प्रवासी महसूलात १३ टक्के वाढ झाली असून, त्यामधून रेल्वेला एक कोटी ६५७ कोटींचा टप्पा गाठण्यात आला आहे. प्रवासी संख्येतही ६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिकीट तपासणी मोहिमेमुळे महसुलात मोठी वाढ दिसून आली असून, या माध्यमातून ३० कोटी महसूल मिळाला आहे. ही वाढ तब्बल ५७.५ टक्के इतकी आहे. याशिवाय व्यावसायिक जाहिरीतीमधून १५.६७ कोटी उत्पन्न मिळाले आहे.
