• Mon. Sep 14th, 2026

आर्णी येथे ३० मार्चपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतील शिवमहापुराण कथा; सात दिवस चालणाऱ्या कथामालेकडे भाविकांचे लक्ष

ByMH LIVE NEWS

Mar 31, 2026
आर्णी येथे ३० मार्चपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतील शिवमहापुराण कथा; सात दिवस चालणाऱ्या कथामालेकडे भाविकांचे लक्ष

नांदेड -प्रतिनिधी

आर्णी (जि. यवतमाळ) येथील श्री सिद्धेश्वर नगरी परिसरात सुप्रसिद्ध कथा प्रवचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी व ओजस्वी वाणीतील श्री शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, या पवित्र कथेला ३० मार्च २०२६ पासून प्रारंभ होणार आहे. ही सात दिवसीय कथा ५ एप्रिल २०२६ पर्यंत दररोज भक्तिभावात संपन्न होणार आहे.

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शिव महापुराण या ग्रंथाच्या माध्यमातून भगवान शिवांचे विविध अवतार, त्यांच्या दिव्य लीलांचे वर्णन, तसेच भक्ती, श्रद्धा, धर्म, कर्म आणि जीवनातील नैतिक मूल्यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे ही कथा अधिक रसाळ, प्रेरणादायी व अध्यात्मिक उर्जा देणारी ठरणार असल्याची भावना शिवभक्तांमध्ये व्यक्त होत आहे.

या सात दिवसीय कथामालेदरम्यान दररोज सकाळी व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भजन-कीर्तन, पूजाविधी, रुद्राभिषेक तसेच महाआरतीचा समावेश असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील तसेच जिल्हाभरातील हजारो भाविक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री बहिरमदेव शिव महापुराण सेवा समिती ट्रस्ट, आर्णी यांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार तयारीत व्यस्त आहेत. भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, पार्किंग तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तरी परिसरातील सर्व शिवभक्तांनी सहपरिवार उपस्थित राहून या दिव्य व आध्यात्मिक कथामृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed