• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat Property: खरातकडे डोळे दिपवून टाकणारी संपत्ती; ६३ एकर जमीन, बंगला अन् फार्म हाऊस ; आकडा तब्बल ४० कोटींवर!

    Ashok kharat Case: खरातशी कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला का, याचीही चौकशी सुरू आहे. शिवनिका संस्थान कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. इतरही संस्था किंवा ट्र्स्ट असेल तर त्याची चौकशी सुरू आहे. त्यातील कार्यकारी मंडळाची चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    अशोक खरात प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मिरगाव येथे ३३ एकर, पाथर्डी गावात दहा एकर, सिन्नरमध्ये दहा एकर, अहिल्यानगरात साडेचार एकर, शिर्डी विमानतळाजवळ साडेपाच एकर, नाशिक, पनवेल, संगमनेर येथे प्लॉट, बंगला, शेतघर, विविध बँकांमध्ये खाती अशी एकूण ४० कोटी ८७ लाख रुपये मूल्याची मालमत्ता आतापर्यंत अशोक खरातकडे आढळून आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खरातच्या मालमत्तांचा तपशील सादर केला. खरातने प्राप्तिकर चुकवला का, याचा तपास सुरू असून याप्रकरणी कोणीही दोषी आढळला तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी विमान प्रशासनाकडे लूकआऊट नोटीस जारी केली होती.

    अशोक खरातच्या संपत्तीविषयी माहिती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याने पत्नी आणि मुलीच्या नावाने अनेक ठिकाणी मालमत्ता घेतल्याचे त्यांनी सांगितले. खरातचे कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत, याचाही तपशील मुख्यमंत्र्यांनी दिला. अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, मलेशिया, केनिया, युगांडा आदी देशांमध्ये खरातने प्रवास केल्याची माहिती तपासात समोर आली. त्याने नातेवाइकांच्या नावावर संपत्ती घेतली किंवा कसे, याचीही चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी खरात प्रकरणात काही सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती असूनही कारवाई केली नाही. राजकारणातील काही लोकांची नावे आणि फोटो समोर आले आहेत. हे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे अशावेळी जे कोणी यात अडकले आहेत त्यांची चौकशी करणार का, असा प्रश्न विचारला. जाधव यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ज्या ज्या व्यक्तीविरोधात पुरावे मिळेल त्या सर्वांची चौकशी करू. आपण सर्व राजकारणात आहोत. कुणाचा फोटो कुणासोबत येतो हे आपण पाहिले आहे. फक्त कुणाचा फोटो कुणासोबत आहे यावरून कुणालाही आरोपी करता येत नाही. पण खरातच्या मोबाईलमधील डीलिटेड डेटाही काढत आहोत. त्यात कुणाचा संपर्क होता का? कुणी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केला का? मेसेज केले का, याची चौकशी केली जाईल’.

    खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तसे झाल्यास शोधणे कठीण झाले असते. त्यामुळे पोलिसांनी विमान प्रशासनाकडे लुकआऊट नोटीस जारी केली होती. बावी आणि शिर्डी पोलिसांच्या तपासात गंभीर बाबी समोर आल्यानंतर दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन करण्यात आली. १७ मार्चला रात्री संबंधित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातने दैवी शक्तीचा खोटा दावा केल्याची तक्रार दिली. पतीच्या मरणाची भीती घालून इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला असेही तक्रारीत नमूद केल्याने खरातवर गुन्हा दाखल कऱण्यात आला. यानंतर त्याला अटक करण्यात आली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा