मुंबई, दि. २२ : लोकाभिमुख सरकार आणि जनताकेंद्रित व्यवस्था कशी असावी, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. रयतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शासनाने या अभियानाला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हे नाव दिले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालण्याचा महाराष्ट्र शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. माहिमविधानसभा मतदारसंघातील अभियानाचा शुभारंभ प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झाला.
यावेळी मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या जनतेकेंद्रित राज्यकारभाराच्या आदर्शावर चालत महाराष्ट्र शासन महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेले हे अभियान लोकाभिमुख प्रशासनाचे प्रभावी उदाहरण आहे. यावेळी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते १२३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या अभियानांतर्गत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून महसुली दाखले, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डविषयक सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवा आदींसह एकूण २७ सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात आयोजित शिबिरात सहभागी होऊन या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रास्ताविक केले. माहिमचे आमदार महेश सावंत यांनी या अभियानामुळे विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होत असून, ही लोकहिताची प्रभावी संकल्पना असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका महाकाळ यांनी केले, तर उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांनी आभार मानले.
0000
