• Wed. Jun 17th, 2026
    सिझेरियनद्वारे प्रसूतीनंतर 21 वर्षीय महिलेचा मृत्यू, हॉस्पिटलच्या हलगर्जीने साक्षी गेली, कुटुंबाचा संताप

    Malegaon Pregnant Woman Death : कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच साक्षीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर एका २१ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. साक्षी शंकर वनीस (रा. करंजाड, ता. बागलाण) असे मृत महिलेचे नाव असून, रविवारी (दि.२२) रात्री नऊ वाजता सिझेरियनद्वारे तिची प्रसूती करण्यात आली होती. प्रसूतीनंतर बाळ सुखरूप असल्याची माहिती आहे.

    काय आहे प्रकरण?

    मृत महिलेचे वडील विजय निंबा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, साक्षीला दुपारी तीन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यानंतर तिला अतिरिक्त रक्तस्त्राव होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सोमवारी (दि.२३) पहाटे तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची तयारी दर्शविली होती, मात्र, रुग्णालय प्रशासनाने नकार देत तिला मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. रोहित गुंजाळ यांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाइकांची गर्दी झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    रुग्णालय प्रशासनावर संताप

    या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच साक्षीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. संतप्त नातेवाइकांनी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पवार यांना घेराव घातला. मृत्यूचे नेमके कारण समजावे यासाठी इन कॅमेरा व समितीसमक्ष शवविच्छेदनाची मागणी करण्यात आली. त्यानुसार पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, बॉडी शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठविण्यात आला. मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक हिरे तपास करीत आहेत.
    Maharashtra Timesकार दुभाजकावर आदळून उलटली, प्रसिद्ध अभिनेत्री Harshil Kalia हिचा मृत्यू, ऐन तिशीत जगाचा निरोप
    प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती व्यवस्थित होती. तत्काळ उपचार सुरू केले होते. रुग्णाकडून सुरुवातीला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, नंतर अचानक तिची प्रकृती खालावल्याने उपचाराला प्रतिसाद मिळणे बंद झाले. आमच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न केले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल ७२ तासांत प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. यात कोणी दोषी असेल, तर नॅशनल मेडिकल कॉन्सिलच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
    – डॉ. दीपक पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महिला व बालरुग्णालय, मालेगाव
    Maharashtra TimesDog Attack : भटक्या कुत्र्याची झडप, वंशिकाताई धीराने लढली, स्वतः जखमी झाली, पण चिमुकल्या भावावर ओरखडाही नाही, अंबरनाथमधील घटना

    डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिची प्रकृती खालावत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात नेण्याची परवानी देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी रुग्णाला आमच्याकडे सुपूर्द न करता थेट सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. यातील दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
    – विजय मोरे, मृत महिलेचे वडील, करंजाड

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा