नाशिक, दि. २२ जुलै (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर हे शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम असून नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला तालुक्यातील एरंडगाव येथील वर्मा लॉन्स येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ कार्यक्रमात मंत्री श्री भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, पुरवठा उपायुक्त प्रशांत काळे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबा महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, येवला नगर परिषद मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने शासनाने हे अभियान सुरू केले आहे. विविध विभागांच्या योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांना थेट लाभ देण्याचा हा उपक्रम राज्यात प्रभावी ठरत आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ, श्रम व खर्चाची बचत होत असून आवश्यक सेवा तात्काळ मिळत आहेत. राज्यभर अशा शिबिरांचे प्रभावी आयोजन करून शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून प्रशासनाने अधिकाधिक सेवा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही केवळ कार्यालयीन प्रक्रियेपुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या दारी पोहोचली पाहिजे. महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध विभाग एकाच व्यासपीठावर आल्याने लाभार्थ्यांना आवश्यक सेवा, प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ तात्काळ मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत असून पारदर्शक, उत्तरदायी आणि संवेदनशील प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. या अभियानात सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले. उपविभागीय अधिकारी श्री.गाढवे यांनी प्रस्ताविकातून महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांची माहिती विशद केली.
यानंतर मंत्री श्री. भुजबळ यांनी पंचायत समिती, कृषी विभाग, सहकार विभाग, महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग, भूमी अभिलेख विभाग, नगरपालिका, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महावितरण, वन विभाग, आधार कार्ड केंद्र, दुय्यम निबंधक कार्यालय, एकात्मिक बालविकास विभाग, महिला बचत गट, आरोग्य तपासणी आदींसह विविध २२ विभागांनी उभारलेल्या स्टॉलना भेट देऊन योजनांची माहिती घेतली.

विविध योजनांच्या लाभांचे वितरण
महसूल विभागामार्फत लक्ष्मी मुक्ती योजना, बंडिंग बोजे कमी करणे, पोटखराब क्षेत्र वहितीखाली आणणे, जिवंत सातबारा व इतर नोंदी अंतर्गत ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार, विधवा, अपंग व वृद्धापकाळ योजनांची ६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. पुरवठा शाखेमार्फत रेशनकार्डामध्ये नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, नवीन व डुप्लिकेट रेशनकार्ड अशा १०० सेवा देण्यात आल्या. सेवा हमी कायद्यांतर्गत अधिवास, जात, उत्पन्न आदी २०० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. पंचायत समितीमार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना १० सायकली, २५० घरकुल प्रमाणपत्रे तसेच २०० एनएलआर कर्ज प्रकरणांचा लाभ देण्यात आला. येवला नगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचे १० लाभ, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गत १०० लाभ, पीएम स्वनिधी योजनेतील २० कर्ज प्रकरणे, ५० जन्म दाखले, १५० आयुष्मान भारत कार्ड व ५० मालमत्ता उतारे वितरित करण्यात आले. महिला व बालविकास विभागामार्फत १० बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे २० लाभ तसेच लेक लाडकी योजनेचे ५० लाभ देण्यात आले. पशुसंवर्धन विभागामार्फत १०० पशुखाद्य/बियाणे वाटप, ९० कृत्रिम रेतन तंत्रज्ञ नेमणूक आदेश तसेच ५० औषध वाटप करण्यात आले. महावितरणमार्फत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे २५ लाभ देण्यात आले. तसेच वीजबिल दुरुस्ती, नवीन वीज जोडणी आणि पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत १३० नागरिकांना सेवा प्रदान करण्यात आली. कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगार नोंदणी, कर्ज वाटप व शिष्यवृत्ती संदर्भातील २१० प्रकरणांचा लाभ देण्यात आला. आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांना लाभ, तसेच २०० सुवर्ण कार्डांचे वितरण करण्यात आले.
वन विभागामार्फत वन्यप्राणी नुकसानभरपाईची १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. भूमी अभिलेख विभागामार्फत १०० सनदांचे वितरण तसेच २० मोजणी प्रकरणांची पूर्तता करण्यात आली. कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५० ट्रॅक्टर, ५० रोटाव्हेटर, ५० मळणीयंत्र लाभ मंजूर करण्यात आले, तर १०० माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून एकूण ३ हजार ११ लाभ व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या लाभांचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शासनाने पारंपरिक कागदी रेशन कार्डाऐवजी क्यूआर कोड (QR Code) युक्त स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या डिजिटल कार्डमुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, वेगवान होणार असून बोगस लाभार्थ्यांना आळा बसून जुनी कागदी कार्ड खराब होणे किंवा हरवणे यासारख्या समस्यांमधून नागरिकांची सुटका होणार आहे. या स्मार्ट रेशन कार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले.
000000
