• Sun. Jun 7th, 2026
    नाशिकमधील बालिकेला अत्याचार करुन संपवलं, कनिष्ठ न्यायालयाच्या चुकीमुळे आरोपीची फाशीची शिक्षा रद्द

    Nashik Minor Girl Assault : नाशिक जिल्ह्यातील एका गावातील या प्रकरणात सात वर्षांची मुलगी दुकानात आईस्क्रीम घेण्यास जात असताना, विलासने तिला पैसे देऊन तंबाखू आणण्यास सांगत, पुढे तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लहान मुलीवरील अत्याचार व हत्येच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या संवेदनशील खटल्यातील मुख्य आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने त्याची बाजू कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे मांडण्याची संधीच दिली नसल्याचा विपरित परिणाम झाल्याचे मंगळवारी समोर आले. नाशिकमधील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी विलास महाले याला सुनावलेली फाशीची शिक्षाच रद्द करुन संपूर्ण खटला नव्याने चालवण्याचा आदेश देण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयावर आली. परिणामी, पीडित कुटुंबातील व्यक्तींना आता पुन्हा खटल्यातील साक्ष व उलट तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.

    कोर्ट काय म्हणालं?

    ‘पोक्सो न्यायालयाने हा खटला आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने चालवावा. त्यापूर्वी मुख्य आरोपी व अन्य आरोपींना योग्य कायदेशीर प्रतिनिधित्व मिळेल याची खात्री करावी. गरज असल्यास त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील उपलब्ध करावा. सरकारी पक्षाला पूर्वीच्या साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवता येईलच, शिवाय नव्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचीही मुभा असेल’, असे न्या. सारंग कोतवाल व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

    काय आहे प्रकरण?

    नाशिक जिल्ह्यातील एका गावातील या प्रकरणात सात वर्षांची मुलगी दुकानात आईस्क्रीम घेण्यास जात असताना, विलासने तिला पैसे देऊन तंबाखू आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलीने त्याला तंबाखू आणून दिली. त्यावेळी त्याने तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि वायरने गळा आवळून तिची हत्या केली. नंतर तिचं शव एका कोपऱ्यात ठेवून त्यावर मोठे बास्केट व कचरा टाकून तो खोलीला कुलूप लावून गेला.

    तिची आई व आजी मुलीला शोधत असल्याचे पाहून मुलीला तंबाखू आणायला पाठवले होते, असे त्याने त्यांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना विलासचा संशय आला. परंतु, वारंवार दूरध्वनी करूनही तो परतला नाही. अखेरीस गावकऱ्यांनी कुलूप तोडल्यानंतर मुलीची बॉडी सापडल्याने खळबळ उडाली.

    मुख्य आरोपी विलास आणि अन्य दोन आरोपीही पीडित कुटुंबाचे नातेवाईक आहेत. विलास हा सध्या तुरुंगातच असून अन्य दोन आरोपी जामिनावर आहेत. ‘विलासला ६ एप्रिल रोजी पोक्सो न्यायालयात हजर करावे आणि अन्य दोन आरोपींनीही त्यादिवशी न्यायालयात हजर रहावे. त्यानंतर न्यायालयाने आधीच्या निर्णयाचा कोणताही प्रभाव न ठेवता केवळ उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून शक्यतो १० महिन्यांच्या आत खटला पूर्ण करावा’, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले.

    खंडपीठाची टिप्पणी

    ‘ज्याला कायदेशीर मदतीचा हक्क आहे अशा आरोपीला ती न दिल्यास न्यायप्रक्रियेचा घात होतो. या प्रकरणात गुन्हा अत्यंत गंभीर असतानाही, न्याय्य पद्धतीने खटला चालवण्यात आला नसल्याने तब्बल नऊ वर्षांनंतरही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. परिणामी, आजपर्यंत पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळू शकलेला नाही’, अशी टिप्पणीही खंडपीठाने निर्णयात नोंदवली.

    ‘आरोप निश्चित करण्यापासून ते महत्त्वाच्या साक्षीदारांच्या तपासणीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेत आरोपीकडे कोणताही वकील नव्हता. एवढेच नव्हे, तर त्याला स्वतःचा बचाव मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. हा त्याच्या मूलभूत अधिकारांचा स्पष्ट भंग आहे. कनिष्ठ न्यायालयाने खटला अतिशय घाईघाईत पूर्ण केला. प्रकरण गंभीर असल्याने सुनावणी जलद व्हायला हवी होती, हे खरे आहे. परंतु त्यासाठी न्यायप्रक्रियेच्या तत्त्वांचा बळी देता येणार नाही’, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा