Shivsena Vs BJP: प्रवीण घुले आणि सचिन घुले यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नगरपरिषदेतील भाजपच्या सत्तेला हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेंनी साताऱ्याचा वचपा नगरमध्ये काढला? प्रवीण घुले यांचा शिवसेनेत प्रवेश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर: सातारा जिल्हा परिषदेत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह दिलेला असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला धोबीपछाड दिला आहे. कर्जत तालुक्यातील राजकारणात सोमवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली असून शहराच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण घुले यांनी अचानक भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्याने कर्जतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घुले यांचा शिवसेना प्रवेश हा भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना हा थेट धक्का मानला जात आहे. घुले यांनी धनुष्यबाण हाती घेताच स्थानिक राजकारणात भूकंप झाल्याची चर्चा रंगत आहे. कारण, कर्जत नगरपंचायतीतील सत्तांतर घडवण्यात घुले यांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे, रोहित पवार यांच्या गटाच्या प्रभावाखालील सत्तासमीकरणात घुले हे किंगमेकर मानले जात होते.
समर्थकांनी स्टेटस ठेवत बदलाचे संकेत दिले
प्रवीण घुले आणि सचिन घुले यांच्या राजकीय निर्णयाची चाहूल सोमवारी सायंकाळपासूनच लागली होती. समर्थकांनी अचानक सोशल मीडियावर ‘जय महाराष्ट्र’चे स्टेटस ठेवत बदलाचे संकेत दिले व काही तासांतच स्वत: प्रवीण घुले मुंबईत पोहोचले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली असून भाजपला डबल धक्का बसला आहे. कारण कर्जत नगरपंचायतीच्या सत्तासमीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या भूमिकेकडे लक्ष
नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले आणि दीर प्रवीण घुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या पुढील भूमिकेकडे. रोहिणी घुले या भाजपमध्येच राहणार की शिंदे गटात जाणार? हा प्रश्न सध्या कर्जतच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून घुले यांच्या पक्षांतरामुळे नगरपंचायतीतील सत्ता ढासळणार का, नवे समीकरण जुळणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा