• Wed. Jun 17th, 2026
    Rupali Chakankar: चाकणकरांना अटक करा, प्रदेशाध्यक्षपदावरून न हटवल्यास आम्हीच पक्ष सोडणार; ठोंबरेंचा आक्रमक इशारा

    “भोंदू बाबासोबत फोटो असणं गुन्हा नाही, पण त्यांना किती वेळा वाचवलं, किती वेळा पोलिसांना आदेश दिले, याचे पुरावे आमच्याकडे आहेत,” असा दावा रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.

    चाकणकरांविरोधात रुपाली ठोंबरेंचं निर्णायक पाऊल; थेट मुख्यमंत्र्‍यांना पत्र, पक्षनेतृत्वालाही दिला सूचक इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, या प्रकरणात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत थेट कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप करत असलेल्या ठोंबरे यांनी आता चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबरोबरच अटकेची मागणी केली आहे. याबाबत ठोंबरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं असून चाकणकरांवर जोरदार निशाणा साधला आहे.

    रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, “हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही, तर महिलांवर झालेल्या अन्यायाचा आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे.” त्यांनी आरोप केला की, “खरात बाबा प्रकरणात चाकणकर यांचा हस्तक्षेप स्पष्ट दिसून येतो आणि काही वेळा पोलिसांवर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. तुम्ही महिला आहात, मग ज्या महिलांचं शोषण झालं त्या महिला नाहीत का?” असा थेट सवाल उपस्थित करत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    “दोन वर्षांपूर्वी काही पीडित महिला पुरावे घेऊन आली, मात्र त्यावेळी या पीडित महिलांना मदत मिळाली नाही. तेव्हा अशोक खरात याच्यावर कारवाई का झाली नाही? तेव्हा सेटलमेंट झाली का? चाकणकर यांनी पदाचा गैरवापर केला. दोन दिवसांत राजीनामा झाला नाही, तर अशा महिलेसोबत काम करणं शक्य नाही. अशा घाण महिलेसोबत आम्ही काम करू शकत नाही. आम्हाला नाईलाजाने पक्षातून अलिप्त व्हावं लागेल,” असा सूचक इशाराही रुपाली ठोंबरे यांनी पक्षनेतृत्वाला दिला आहे.

    दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी आणि त्याचे राजकीय परिणाम आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई होणार का? चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा