Nagpur News: संदीप जोशी यांचा संन्यासाच्या घोषणेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत त्यांना निर्णय बदलण्याची विनंती केली होती.
काही दिवसांपूर्वी जोशी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांनी हा निर्णय तात्पुरता असल्याचे स्पष्ट करत पूर्णपणे राजकारण सोडण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे. १३ मे रोजी त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढील सहा महिने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असून हा काळ विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संदीप जोशी यांनी सांगितले की, काही शारीरिक अडचणी आणि वैयक्तिक कारणांमुळे हा ब्रेक घेण्याची गरज भासली. “स्वतःला नव्याने तयार करण्यासाठी आणि आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. मात्र हा कायमस्वरूपी संन्यास नसून तात्पुरती विश्रांती आहे,” आपल्या या निर्णयाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “मुख्यमंत्री माझे मित्र, बंधू आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार सहा महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा सक्रिय होणार आहे,” असे जोशी म्हणाले.
तसेच वरिष्ठ नेत्यांनीही वैयक्तिक संवाद साधत राजकारणातून दूर जाऊ नये, असा सल्ला दिला. “कार्यकर्त्यांची भावना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या आग्रहामुळेच मी माझा निर्णय बदलला,” असं म्हणत सहा महिन्यांच्या या ब्रेकदरम्यान ते पूर्णपणे निष्क्रिय राहणार नसून समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहतील, असेही त्यांनी सांगितले. “राजकारणापासून थोडा काळ दूर राहणार असलो तरी समाजाशी असलेले नाते कायम राहील,” असे जोशी म्हणाले.
