Sindhudurg Crime News: यात एका कारमधून काही तरुण उतरले आणि या तरुणांनी माझ्या बहिणीला उचलून गाडीत घातले, नंतर तिला इंजेक्शन देण्यात आलं, असं भावाने पोलिसांना सांगितलं.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे नाकाबंदी करण्यात आली. शाळकरी मुलगीने गुरूवारी संध्याकाळी भावाला ‘माझे अपहरण झाल्याचे कुटुंबियांना सांग’ असे सांगितले. त्याप्रमाणे भावानेही तिला मदत केली. गुरुवारी सायंकाळी ही मुलगी मालवण शहरात दाखल झाली. रात्री शहरात राहून तिने एका घरात जेवणाचाही आस्वाद घेतला होता. मुलीच्या सांगण्याप्रमाणे तिच्या भावानेही मुलीच्या अपहरणाचा बनाव हुबेहुबपणे पोलीस यंत्रणांना सांगितला. यात एका ओमनी कारमधून काही युवक उतरले, त्यांनी तिला उचलून गाडीत घातले, तिला इंजेक्शन देण्यात आले आणि घेऊन गेल्याचे सांगितले.
या घटनेनंतर पोलिसांनी सर्व रस्त्यांवरील आणि घराबाहेरीलही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सर्वत्र नाकाबंदी करून शोध मोहीम राबविली. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्वतःहून याप्रकरणी तपास यंत्रणांना सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी गांभीर्यपूर्वक सर्व तपास सुरू केला होता. यासाठी जिल्ह्यातील अनेक टीम मालवणमध्ये मालवण पोलिसांच्या मदतीला दाखल झाल्या होत्या. रात्रभर सर्वत्र शोध मोहीम राबवण्यात आली होती.
अखेर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने शहरातीलच एका भागात तिचे वास्तव्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यावेळी उलट तपासणीत तिने स्वत:च्या अपहरणाचा बनाव आपणच रचल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
