अशोक खरात या भोंदू बाबाचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचादेखील समावेश आहे. या फोटोवर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “राजकारणात वावरताना अनेक लोकांशी संपर्क येतो, पण समोरच्याचे पाप त्याच्या कपाळावर नसते,” अशा शब्दांत शिरसाट यांनी नेत्यांची पाठराखण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. अधिवेशनाचे कामकाज आटोपल्यानंतर मंत्री संजय शिरसाठ छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
“सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत शेकडो लोक फोटो काढत असतात. त्यातील कोण खुनी आहे, कोण बलात्कारी आहे किंवा कोण काय उद्योग करतो, हे फोटो काढताना माहित नसते. जर केवळ फोटो काढल्यामुळे नेत्यांना राजकारण सोडावे लागणार असेल, तर उद्यापासून नेत्यांना मंत्रालयात बुरखा घालून फिरावे लागेल”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.
“खरातचा ‘राम रहीम’ होणार”
अशोक खरात याच्या कृत्यावर भाष्य करताना शिरसाट यांनी त्याला कडक शासन होण्याची खात्री दिली. “खरातने जे काही केले आहे, तो नीचतेचा कळस आहे. या भोंदू बाबावर आता देव कोपला आहे. त्याचे कृत्य हे धर्माला लागलेला कलंक असून, त्याचे हाल ‘राम रहीम’ सारखे झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला अनेक वर्षे जेलमध्येच सडावे लागेल”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.
‘खरात प्रकरणामुळे नेते आता सावध झाले’
अशोक खरात याच्यासोबत राजकारण्यांच्या भेटीगाठींबाबत शिरसाट यांनी भूमिका मांडली. “आम्ही मंदिर, सप्ताह किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जातो. तिथे चांगल्या भावनेने जातो. पण तिथे जर काही चुकीचे घडत असेल, तर नेत्याला दोष देणे चुकीचे आहे. या प्रकरणामुळे आता सर्वच राजकीय नेते सावध झाले आहेत”, असं संजय शिरसाट म्हणाले.
जादूटोण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया
“खासदार संजय राऊत म्हणतात की वर्षा बंगल्यावर लिंबू निघाले, जादूटोणा केला. जर जादूटोणा करून मुख्यमंत्री होता आले असते, तर मग लोकांकडे जाण्याची काय गरज होती? हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे हे चालत नाही. उलट संजय राऊत हेच मोठे जादुगार आहेत, ज्यांनी ठाकरेंची सत्ता पालटली आणि अख्खा पक्षच बुडवून टाकला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, खरातला मदत करणाऱ्यांवर आणि या प्रकरणात भागीदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल”, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा