Versova-Bhayander Coastal Road: उत्तरेकडील सागरी किनारा मार्गाच्या कामांची रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. दुसऱ्या टप्प्यात पाच प्रमुख पॅकेजअंतर्गत काम पूर्ण केलं जाणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह महामुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजना आणि प्रकल्प हाती घेतले जात आहेत. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यात असून यात सागरी किनारा मार्गाचाही समावेश आहे. या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण असा दुसरा टप्पा म्हणजे, वांद्रे ते वर्सोवा मार्च २०२८, तर वर्सोवा ते भाईंदर डिसेंबर २०२८पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांकडून कामाची पाहणी
मुंबई सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची फडणवीस यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज अ), मालाड माइंडस्पेस इंटरचेंज (पॅकेज ब), चारकोप मरिना एन्क्लेव्ह (पॅकेज क आणि ड) आणि चारकोप सेक्टर-८ (पॅकेज इ) येथील कामांची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी सागरी किनारा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून होते.
‘मुंबईतील वाहतुकीसाठी एक समांतर आणि सिग्नलमुक्त मार्गाची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने सागरी किनारा मार्गाचे काम सुरू आहे. नियोजित आराखड्यानुसार या कामाने वेग घेतला आहे. मान्सूनचे दोन-तीन महिने आणि त्यानंतरच्या कालावधीतील कामेही नियोजनानुसार वेळेत पूर्ण केली जातील,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या पाहणीदौऱ्यावेळी मंत्री आशीष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम आदी उपस्थित होते.
Mumbai-Pune High Speed Rail: मुंबई ते पुणे अवघ्या 48 मिनिटांत! सात नव्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांना वेग; रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
‘पॅकेज अ’
या प्रकल्पांतर्गत ‘मढ इंटरचेंज’ नंतर लोखंडवाला येथे प्रकल्पाचा दुसरा मोठा ‘इंटरचेंज’ उभारण्यात येणार आहे. या परिसरात सध्या चार प्रमुख रस्ते एकत्र येत आहेत. भगतसिंगनगर पुलाच्या कामाचेही यामध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. येथे त्रिस्तरीय वाहतूक व्यवस्था विकसित करण्यात येणार असून, तिची रचना वरळी येथील प्रसिद्ध ‘इंटरचेंज’च्या धर्तीवर करण्यात येईल.
‘पॅकेज ब’
माइंडस्पेस परिसरात प्रकल्पातील सर्वांत मोठ्या ‘इंटरचेंज’ पैकी एक विकसित करण्यात येत असून, येथे एकूण नऊ रॅम्पची व्यवस्था असेल. याद्वारे विविध दिशांतील वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन होणार आहे. पूर्व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोडशी थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. हा जोडमार्ग सुमारे ४.५ किलोमीटरचा असेल.
Pune Ring Roadच्या नियोजनाचा खेळखंडोबा! रस्ते विकास महामंडळाकडून ११७ गावं पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; आराखडा रखडणार?
वर्सोवा ते भाईंदर टप्प्याची वैशिष्ट्ये
वर्सोवा-दहिसर मार्गाचे सहा पॅकेजमध्ये बांधकाम
हा मार्ग साधारण २२ किमी लांबीचा
या मार्गाला दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गाची जोड
वर्सोवा ते दहिसर प्रकल्पाचा खर्च १६ हजार ६२१ कोटी रुपये
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा