राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने विधानसभेत मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपने जोरदार आक्षेप घेतला. मंत्री नितेश राणे यांच्यासह शंभुराज देसाई, दादा भुसे आणि इतर आमदार आव्हाडांवर भयंकर संतापले होते. आव्हाडांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी नितेश राणेंनी केली. यानंतर सभागृहातला वाढता गोंधळ पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला आणि शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे आवाहन केले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही सभागृहातलं वातावरण तापलं होतं.