यवतमाळ, दि. ६ : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज आढावा बैठक घेतली. नाट्यगृहातील प्रलंबित कामे, आवश्यक निधी आणि उर्वरित कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहेत्रे, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी नाट्यगृहासाठी आतापर्यंत झालेला खर्च, उपलब्ध निधी तसेच उर्वरित कामांसाठी आवश्यक आर्थिक तरतुदीची माहिती घेतली. वातानुकूलन यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था, स्टेज, साउंड सिस्टीम, अकॉस्टिक व्यवस्था आदी महत्त्वाच्या कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, “महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह सुरू करण्याची नागरिकांची दीर्घकालीन मागणी आहे. नाट्यगृहाच्या कामांसाठी निधीची कमतरता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारत सुस्थितीत असल्याचे नगरपरिषदेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक कामांसाठी सक्षम संस्थेची निवड करून तातडीने प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून नाट्यगृह लवकर सुरू करता येईल.”
बैठकीत नाट्यगृहाची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी ते लवकरात लवकर खुले करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
००००
