• Thu. Aug 6th, 2026

    राजधानीत मराठी चित्रपट प्रेमींसाठी नवे व्यासपीठ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 6, 2026
    राजधानीत मराठी चित्रपट प्रेमींसाठी नवे व्यासपीठ – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ६:  दिल्लीतील चित्रपट रसिकांना दर्जेदार मराठी चित्रपटांचा सातत्याने आस्वाद घेता यावा आणि त्यांची चित्रपटांविषयी जाण समृद्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या पुढाकारातून कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन  उद्या ( दि. 7)  नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

    दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात हा कार्यक्रम होईल. उद्या सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

    महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने सुरू होणारे हे मंडळ दिल्लीतील मराठी चित्रपटप्रेमींसाठी एक महत्त्वाचे सांस्कृतिक व्यासपीठ ठरणार आहे. मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या धर्तीवर या मंडळामार्फत वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, मराठी चित्रपटांचा दर्जेदार वारसा राजधानीत पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे.

    या उपक्रमांतर्गत निवडक आणि पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन,  दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, तंत्रज्ञ आणि चित्रपट समीक्षकांसोबत संवाद सत्रे, चित्रपटविषयक व्याख्याने, कार्यशाळा, परिसंवाद आदी आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील मराठी मंडळींबरोबरच इतर भाषिक प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा आणि आधुनिक वाटचाल जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

    भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणाऱ्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने सुरू होणारे हे मंडळ केवळ चित्रपट प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता रसिकांमध्ये दर्जेदार सिनेमाविषयी अभिरुची निर्माण करणे, नव्या पिढीला मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा समजावून सांगणे तसेच मराठी चित्रपटसृष्टीला  अधिक व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी  राजधानीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी दिली.

    0000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

     

     

    ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी – उपसभापती सचिन अहिर   – महासंवाद
    मुंबईतील पुनर्विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जमिनींवरील प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक – उपसभापती सचिन अहिर – महासंवाद
    पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed