Pune Metro: पुण्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित मेट्रो भवनचं उद्घाटन झालं. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात मेट्रोचे जाळे 200 किमी लांब वाढवणार असल्याची माहिती दिली.
मेट्रो भवनचे उद्घाटन
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महामेट्रो) नूतन प्रशासकीय इमारत ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
Navi Mumbai News: खारघर-तुर्भे लिंक रोडमुळे कोंडी फुटणार, दुहेरी बोगद्यांनी 10 मिनिटांत प्रवास; 2028पर्यंत मार्ग तयार
दररोज दोन-अडीच लाख प्रवासी
फडणवीस म्हणाले, ‘पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींमुळे काम सुरू होण्यास विलंब झाला. मात्र, काम सुरू झाल्यानंतर अत्यंत वेगाने प्रगती झाली असून, देशातील सर्वाधिक गतिमान मेट्रो प्रकल्पांपैकी पुणे मेट्रोचा उल्लेख केला जात आहे. पुणेकरांनी मेट्रोला आपलेसे केले आहे. सध्या शहरात ३३ किलोमीटर मेट्रो सुरू असून, दररोज सुमारे दोन ते अडीच लाख प्रवासी यातून प्रवास करीत आहेत. विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात हा आकडा ५.७५ लाखांपर्यंत पोहोचला होता, जो एक विक्रम आहे.’
‘पुणे मेट्रोच्या विविध स्थानकांची रचना, प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा; तसेच भविष्यातील मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रोचे संचालन अत्याधुनिक ऑटोमॅटिक सिग्नलिंग, कमांड-कंट्रोल सिस्टीम, सीसीटीव्ही सुरक्षा आणि अचूक नियोजनावर आधारित असते. त्यामुळे अशा प्रकल्पासाठी सुसज्ज प्रशासकीय मुख्यालय आवश्यक असते. आता ‘मेट्रो भवन’ उपलब्ध झाल्यामुळे मेट्रोच्या कामकाजाला अधिक गती मिळेल.’
अजित पवारांचे स्मरण
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून, आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल.’ पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.
