Chhatrapati Sambhajinagar: सध्या ऐन पावसाचे दिवस चालू असताना. मराठवाड्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत आहे.पावसाच्या दिवसात ऐन शेती चालू असताना खरीप पिकांवर मात्र त्याचा चांगलाच परिणाम होत आहे. मराठवाड्यात बुधवारपर्यंत सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दहा दिवसांपासून पावसाची विश्रांती
मराठवाड्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. शेवटच्या टप्प्यातील पेरणीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. मात्र, दहा दिवसांपासून विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यभरात कमी-अधिक स्वरूपात पाऊस सुरू असला तरी मराठवाड्यात पाऊस नाही. तुरळक सरी पिकांसाठी फायदेशीर ठरत नसल्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पिकांवर प्रतिकूल परिणाम
पिके वाढीच्या अवस्थेत असताना पाऊस थांबल्यामुळे वाढीवर प्रतिकूल परिणामझाला आहे. तसेच पिकांवर अळी, बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. या हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ३७९.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना ३९३, बीड २७२.२, लातूर २६४, धाराशिव २८९, नांदेड ४६९, परभणी ३३९ आणि हिंगोली ४५५ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक तूट निर्माण झाली
विभागात आतापर्यंत सरासरी ४६७.४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ३५८.८ मिमी पाऊस झाला आहे. जवळपास ४९ मिमीची तूट निर्माण झाली असून पावसाची टक्केवारी ८८ टक्के आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ४१३ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ २६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यातही ४६७ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३३९ मिमी पाऊस झाला आहे.
Pune News : 20 उद्योग चाकणबाहेर जाणार या निव्वळ अफवा, उद्योगमंत्र्यांचा दावा, खड्डे-वाहतूक कोंडीवर उपाययोजना जाहीर
मोठ्या दहा धरणात ६८ टक्के पाणीसाठा
जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून होणारी आवक थांबली असून प्रकल्पात ९३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना २६.२९, येलदरी ६१.०५, सिद्धेश्वर २६.२७, माजलगाव २१.९, मांजरा १५.७६, पैनगंगा ६६, मानार ५८.६३, निम्न तेरणा २५.९२, विष्णुपुरी ९५.२० असा धरणनिहाय पाणीसाठा झाला आहे. सिना कोळेगाव धरणात अद्याप पाणीसाठा झालेला नाही. मोठ्या दहा धरणात ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
Mumbai News : बेस्ट बसच्या धडकेत हेमंत जोशींचा अंत, कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय, 5.25 कोटींची रक्कम दोन महिन्यात देण्याचे BMC ला आदेश
१९ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरी
नांदेड आणि बीड जिल्ह्यात अधिक तूट निर्माण झाली आहे. वाढती तूट आणि पावसाचा खंड चिंताजनक ठरला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो. मात्र, इतर जिल्ह्यात पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता आहे.
