योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या शब्दानंतर त्यांनी पाणी, औषधोपचार आणि सलाईन घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा पाणी आणि औषधोपचार घेणे बंद केले आहे.
दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची तब्बल 3 तास चर्चा झाली. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीआधी मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांसोबत अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या मळ्यात तब्बल पाच ते सहा तास चर्चा झाली. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार प्रयत्नशील असल्याचा शब्द शिष्टमंडळाने दिल्यानंतर जरांगे यांनी पाणी प्यायले, तसेच औषधोपचार घेण्यास सुरुवात केली. मात्र, आज या आश्वासनाला तिसरा दिवस उलटूनही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
शरद पवारांबद्दल काय म्हणाले जरांगे?
यावेळी मंत्री विखे पाटील यांनी, शरद पवारांनी काय केलं? महाविकास आघाडीने काय केलं? असा सवाल उपस्थित केल्याचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मग फडणवीसांनी व भाजप सरकारने तरी काय केलं? जे प्रमाणपत्र तुम्ही दिले होते ते रद्द ही तुम्हीच केले. आधीच्या सरकारमधील नेत्यांनी काही केलं नाही म्हणूनच मराठा समाजाने तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं. तुमचे आमदार आणि खासदार सत्तेच्या गादीवर मराठ्यांनी पाठवले. मराठ्यांचं भलं करण्यासाठीच आम्ही तुम्हाला सत्ता दिली. मग आता तुम्ही आम्हालाच विचारता की महाविकास आघाडीने काय केलं आणि शरद पवारांनी काय केलं?” असा सवाल जरांगे यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी सरकारवर आणखी गंभीर आरोप केले. तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आणि तुम्हीच प्रमाणपत्र रद्द केलं. हे आता मराठ्यांना कळायला लागलं आहे, असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर अद्याप शासन निर्णय झालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
“मराठ्यांच्या पोरांना हात लावून दाखवा, ताकद दाखवतो”
सरकारला इशारा देताना जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला. मी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलो आहे. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र सरकारच्या डोक्यात जर वेगळं काही चाललं असेल, तर माझा इशारा आहे. मागच्या वेळेस केलं तसं आता करू नका. या वेळेस माझ्या मराठ्यांच्या पोरांना किंवा कुणालाही काठी लावून दाखवा, मग तुम्हाला मराठ्यांची ताकद दाखवतो, असा आक्रमक इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, तुमच्या म्हणण्यानुसार मी औषधं, सलाईन आणि पाणी घेतलं. विखे पाटील, तुम्ही दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता. त्यामुळेच रात्री 11 वाजल्यापासून मी पुन्हा औषधोपचार आणि पाणी घेणं बंद केलं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता सरकारने विलंब न करता मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आठव्या दिवशीही अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा तणाव कायम असून सरकारसमोरील पेच आणखी वाढला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा