Baramati Ganja Case Vicky Kamble Arrested : पुण्यातील बारामतीमधील जळोची येथील गांजा प्रकरणात पोलिसांनी विकी कांबळेला अटक केली आहे. चौकशीत याचे धागेदोरे ओडिशापर्यंत असल्याचं समोर आलं आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
28 फेब्रुवारी रोजीजळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान तेथे ‘समृद्धी अॅक्वा’ कंपनीचे 1500 लिटर क्षमतेचे दोन मोठे प्लास्टिक ड्रम आढळले. या ड्रममध्ये 465 पॅकेट्समध्ये 478 किलो 950 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी ड्रमसह सुमारे 2 कोटी 39 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन ड्रममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कोणी आणला? तो कुठून आला? आणि पुढे त्याचे वितरण कोणाकडे होणार होते? हा तपासासमोरील महत्त्वाचा प्रश्न होता.
Pune Vidyanand Bapat: मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, लोकांनी डीजेवर नाचवलं, मीम्सचाही धुमाकूळ; विद्यानंद बापट खास शैलीत बोलले, नेमकं काय म्हणाले?
वाहनांच्या हालचालींचे विश्लेषण
पोलिसांनी गेल्या सुमारे सहा महिन्यांत तांत्रिक तपासावर भर देत मोबाईल सीडीआर, डम्प डेटा, आयएमईआय मॅपिंग, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयितांच्या वाहनांच्या हालचालींचे विश्लेषण केले. सहआरोपींची चौकशी करून मिळालेल्या माहितीचीही अन्य पुराव्यांच्या आधारे पडताळणी करण्यात आली. या तपासात प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांची नावे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी प्रकाश काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग आणि राहुल गोरे यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
कांबळेचा ओडिशातील जॉकीशी संपर्क
तपासादरम्यान कांबळेचा ओडिशातील जॉकी माझी याच्याशी संपर्कअसल्याचा धागा पोलिसांना मिळाला. त्यामुळे जळोचीतील गांजा प्रकरणाचा संबंध स्थानिक व्यवहारापुरता मर्यादित नसून त्यामागे आंतरराज्यीय पुरवठा साखळी असण्याची शक्यता तपासात बळावली. कांबळेच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीनंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून त्याला इनोव्हा वाहनासह ताब्यात घेतले होते. वाहनाच्या तपासणीत 66 पॅकेट्स आणि एका स्वतंत्र पिशवीत एकूण 134 किलो गांजा आढळून आला. या कारवाईत वाहन, मोबाईल आणि गांजासह सुमारे 42 लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
23 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त
या गांजाचा स्रोत ओडिशाशी संबंधित असल्याचं तपासातून समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, 21 मे रोजी बारामतीतील गवारे चौकातही पोलिसांनी 23 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त केला होता. फलटणकडून बारामतीच्या दिशेने गांजा आणला जात असल्याच्या माहितीवरून इनोव्हा क्रिस्टा वाहन अडवून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. या तपासातही विकी कांबळे आणि संग्राम उर्फ चंदन सिंग यांच्याशी संबंधित धागे समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बारामती शहर पोलीस ठाण्यातील या दोन प्रकरणांत मिळून 501 किलो 960 ग्रॅम गांजा जप्त झाला आहे. त्यात सांगलीतील 134 किलो गांजाच्या कारवाईचा संदर्भ जोडल्यास तपासातून समोर आलेल्या संबंधित कारवायांमध्ये एकूण 635 किलो 960 ग्रॅम गांजाचा मुद्दा पुढे येतो. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. विकी कांबळेला बुधवारी 2 सप्टेंबर रोजी रात्री अटक केल्यानंतर गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी बारामतीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. गांजाचा मूळ स्रोत, ओडिशापासून बारामतीपर्यंतची वाहतूक, वापरण्यात आलेली वाहने, मोबाईल व डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार तसेच अन्य संशयितांची भूमिका तपासण्यासाठी त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. त्यानंतर न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
साखळीत आणखी कोणाचा सहभाग?
आता पोलिसांसमोर गांजाच्या मूळ पुरवठादारांपर्यंत पोहोचण्याचे तसेच या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान आहे. विशेषतः ओडिशातील संपर्क, संग्राम उर्फ चंदन सिंग व जॉकी माझी यांची भूमिका, गांजा वाहतुकीसाठी वापरलेली वाहने, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास केला जात आहे . या कारवाईत बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कारंडे तसेच बारामती शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काम केले. पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी असून, पोलिसांकडून तपासाच्या आधारे समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
