• Fri. Sep 11th, 2026

Pune News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रियकराला कॅफेत नेले; चुंबन घेतलं, 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाला लग्नाचे आमिष दाखवत कॅफेत नेवून तिथे चुंबन घेतल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या पोलीस तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातून अल्पवयीन मुलाशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकराला कॅफेमध्ये नेले आणि त्याचे चुंबन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलाचे एका २१ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या तरुणीने अल्पवयीन मुलाला लग्नाचे आमिष दाखवून त्याला तळेगाव दाभाडे परिसरातील एका कॅफेमध्ये नेले. कॅफेमध्ये असताना तरुणीने अल्पवयीन मुलाचे चुंबन घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलाची पोलीस ठाण्यात तक्रार

दरम्यान, हा प्रकार अल्पवयीन मुलाच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी तातडीनेतळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत, संबंधित तरुणीने आपल्या मुलाला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूने त्याचे चुंबन घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तरुणीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित २१ वर्षीय तरुणीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर गुंतागुंतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलगा आणि तरुणी यांच्यात परस्पर संमती असल्याचा दावा असला तरी, अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत पॉक्सो कायद्यातील तरतुदी लागू होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कायद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

या प्रकरणात तक्रारीतील आरोप, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि तपासातून समोर येणारे तथ्य यावरच पुढील कायदेशीर कारवाई अवलंबून असणार आहे.