• Thu. Mar 19th, 2026
    Pune Crime: पुण्यात टिपू पठाण टोळीवर पुन्हा मोक्का; खंडणी रॅकेटचा पर्दाफाश, फरार ‘पच्चीस’ गजाआड

    Pune Crime News : हडपसरमधील कुख्यात टिपू पठाण टोळीवर काळेपडळ पोलिसांनी तिसऱ्यांदा ‘मोक्का’ लावला आहे. हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या टोळीचा फरार साथीदार जेरबंद केला आहे.

    पुण्यात टिपू पठाण टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का, एकाला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीच्या दहशतीला लगाम लावण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ‘मोक्का’चे अस्त्र उगारले आहे. एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणाऱ्या या टोळीवर काळेपडळ पोलिसांनी तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या धडक कारवाईत टोळीचा फरार साथीदार फैजान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, गुन्हेगारी विश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या टोळीची पोलिसांनी चांगलीच नाकेबंदी केली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    हडपसरमधील सय्यद नगर भागात राहणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार समोर आला होता. रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या सात साथीदारांनी या व्यावसायिकाला त्यांच्या ‘ख्वाजा मंजिल’ येथील कार्यालयात बोलावून घेतले. “तुझ्या हॉटेलसाठी लागणारे मटण आमच्या भागीदारीत असलेल्या दुकानातूनच विकत घ्यावे लागेल,” असा सज्जड दम त्यांनी भरला. एवढ्यावरच न थांबता, दरमहा ५,००० रुपयांच्या खंडणीची मागणी करत, पैसे न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही दिली.या संदर्भात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य आणि टिपू पठाण टोळीचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता, पोलिसांनी या टोळीवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ म्हणजेच ‘मोक्का’ लावण्याचा निर्णय घेतला.

    Maharashtra TimesLPG Gas shortage : ‘वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?’ रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

    फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    या गुन्ह्यातील एक मुख्य आरोपी फैजान उर्फ पच्चीस रमजान उर्फ कादर शेख (वय २१) हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. तो सय्यद नगर भागात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. याआधी देखील टिपू पठाणवर जमीन हडपणे आणि खंडणीचे दोन मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होते, मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला होता. आता तिसऱ्यांदा मोक्का लागल्याने या टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत.

    Maharashtra TimesMurlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, पायावर शस्त्रक्रिया; एक महिना सक्तीची विश्रांती, दुखण्याबद्दल दिली माहिती

    पोलीस पथकाची कामगिरी

    ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्यासह राजेंद्र वाघमारे, दादासो नळे, परशुराम पिसे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा