• Sat. Jun 6th, 2026
    Beed Crime : परळीत माणुसकीला काळीमा; 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, महाराष्ट्रात संतापाची लाट, नराधमांचा शोध सुरु

    बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर क्रूर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ओळखीचा फायदा घेत नराधमांनी हे कृत्य केले आहे. आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरु आहे.

    बीडच्या परळीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ओळखीचा फायदा घेत दोन नराधमांनी पीडितेचे हातपाय बांधून आणि तोंडावर बोळा कोंबून अत्यंत क्रूरपणे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, परळी ग्रामीण पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत.

    गोडीने बोलावून केला पाशवी अत्याचार

    मिळालेल्या माहितीनुसार, धारावती तांड्यावर राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन नराधमांनी गोडीने घरी बोलावले. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून, पीडितेचे हातपाय बांधले आणि तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. त्यानंतर या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचारानंतर, “कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन,” अशी धमकी देत त्यांनी पीडितेला सोडून दिले.Maharashtra TimesMumbai Crime : भांडुपमध्ये निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; ‘पोलीस’ असल्याचं सांगत घरातच केलं ‘डिजिटल अरेस्ट’

    पालकांचा धाडसपूर्ण पवित्रा आणि गुन्हा दाखल

    पीडित मुलीने घरी परतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या मुलीवर ओढवलेला प्रसंग ऐकून पालकांनी कोणताही विलंब न करता थेट परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

    या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४, १२७(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम ४ व १७ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १२५/२०२६) दाखल केला आहे.

    Maharashtra TimesAccident News : पुण्यात जॉब, डोळ्यांत स्वप्नं, थायलंडच्या सहलीतच नको ते घडलं; बीडच्या पूजाचा फुकेतमध्ये दुर्दैवी अंत

    आरोपी फरार, पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

    गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांच्या हालचालींची कुणकुण लागताच दोन्ही आरोपी फरार झाले. सध्या अंबाजोगाई उपविभागाचे ‘पिंक पथक’ आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखालील टीम आरोपींचा कसून शोध घेत आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक शासन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा