• Sun. Jun 14th, 2026

    Beed Crime: मी बाहेर जातोय, बीडच्या तुकाराम मुंडेंचा घरी कॉल अन् अचानक गायब; फिल्मी स्टाइल घटनेत आता नवा ट्विस्ट!

    Beed Crime: मी बाहेर जातोय, बीडच्या तुकाराम मुंडेंचा घरी कॉल अन् अचानक गायब; फिल्मी स्टाइल घटनेत आता नवा ट्विस्ट!

    बीड : बीडच्या परळी शहरातून तुकाराम पंढरीनाथ मुंडे (वय 54 वर्ष) यांचे औष्णिक विद्युत केंद्र परिसरातून दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले होते. या अपहरणाच्या घटनेने परळी तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तुकाराम मुंडे हे दुपारी दोनच्या सुमारास औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात आढळून आले होते. त्याच वेळी त्यांनी घरी एक कॉल केला आणि मी बाहेर जातोय, असं ते बोलले. नंतर त्यांचा फोन बंद झाल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले. अखेर आता हे तुकाराम मुंडे सुखरूप घरी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

    याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुकाराम मुंडे यांचे अपहरण झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यावेळी अपहरण झालेल्या तुकाराम मुंडेंची स्कुटी आणि चप्पल संदिग्ध स्वरूपात घटनास्थळी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली. परिसरातील आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका फुटेजमध्ये चारचाकी गाडी निदर्शनास आली. सीसीटीव्ही फुटेज आणि टोलनाक्यावरील फुटेजद्वारे पोलिसांनी अमरावतीपर्यंत पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग केला. अपहरण केलेल्या आरोपींना पोलीस आपला पाठलाग करत आहेत याची माहिती मिळाली असावी. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तुकाराम मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट रस्त्यावर डोळ्यावर पट्टी बांधून सोडून दिले. घाबरलेल्या तुकाराम मुंडे यांनी एका इसमाला मदत मागितली आणि थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठले.

    हिंगणघाट पोलिसांनी बीड पोलिसांची संपर्क साधून अपहरण झालेले तुकाराम मुंडे यांना बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. बीड पोलिसांनी मुंडे यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर तपास यंत्रणा फिरवली आणि तपासाअंती मुख्य सूत्रधार हा परळी औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंत्याच्या चालक संतोष वंजारे निघाला. बीड पोलिसांनी त्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता संपूर्ण अपहरणाचा घटनाक्रम व कोण कोण या अपहरणात सहभागी आहेत, याबाबतची माहिती दिली.

    बीड पोलिसांनी आरोपींचा नागपूर, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, या ठिकाणी शोध घेऊन तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आणि परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणासह गुन्हा नंबर 266/ 2026 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील आरोपी सचिन वंजारे, संतोष वंजारे परळीमधील असून उर्वरित दोन आरोपी हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. यामधील सचिन वंजारे हा परळीतील संभाजीनगर ठाण्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार होता, तर दुसरा आरोपी संतोष वंजारे हा औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंताचा चालक म्हणून काम करत होता.

    दरम्यान, सुखरूप सुटका झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी स्थानिक आरोपींकडून भविष्यात आमच्या जीवाला धोका असू शकतो, असं म्हणत अपहरण प्रकरणी ज्यांनी कुणी आरोपींना मदत केली असेल किंवा माहिती पुरवली असेल, अशा सर्वांच्या फोनचे लोकेशन किंवा CDR काढावा, अशी मागणी केली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed