महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी ऑगस्ट महिन्यात पुन्हा मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. असं असलं तरी पुढचे 15 दिवस शेतकऱ्यांना दिलासा देणारे असणार असल्याचं डख यांनी सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला. यानंतर पावसाचा वेग मंदावणार आहे. पुढचे काही दिवस राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. पण त्याची तिव्रता जास्त राहणार नाही. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात 15 ऑगस्टपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडेल. पण त्यानंतर पुढच्या 15 दिवसांत पुन्हा मोठा पाऊस येणार आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालेल, असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.
“राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. त्यामुळे शेतीची कामे करुन घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. असं असलं तरी 6 ऑगस्टपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन 10 मिनिटे ते अर्धा तासाचा पाऊस होऊ शकतो. असा पाऊस दुपारनंतर येईल. पण मुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस येणार नाही”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होणार
“7 ऑगस्टनंतर वातावरणात आणखी बदल होईल. चांगलं सूर्यदर्शन होईल. शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी वेळ मिळणार आहे. पण 16 ते 17 ऑगस्टच्या काळात बंगालच्या खाडीत परत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. आपल्याकडे उन्हाची तीव्रता राहील त्यावेळी तो कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात येईल. त्यावेळी पुन्हा राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल”, असं भाकीत पंजाबराव डख यांनी वर्तवलं आहे.
17 ते 30 ऑगस्ट दमदार पावसाची शक्यता
“ऑगस्ट महिन्यात देखील चांगला मोठा पाऊस येणार आहे. 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडेल. सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. या जिल्ह्यांपैकी वेगवेगेळ्या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 7 ऑगस्टपर्यंत दररोज थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे”, असं डख यांनी सांगितलं.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?
“धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराडा, मालेगाव, नांदुरा, अकोट या भागांमध्ये दुपारपर्यंत ऊन राहील. दुपारनंतर 20 मिनिटांचा पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी 15 ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करुन घ्यावेत. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरला परतीचा भरपूर पाऊस पडणार आहे”, असा मोठा दावा पंजाबराव डख यांनी केला.
‘पावसाचा खंड पडणार नाही’
“सोशल मीडियावर पावसाचा खंड पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात. महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडला नाही तर त्याला खंड म्हणतात. राज्यात 7 ते 8 ऑगस्टपर्यंत थोडाफार पाऊस सुरु राहणार आहे. 7 ऑगस्टपर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरु राहील. त्यानंतर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा इथे थोडा-थोडा पाऊस येत राहील. पावसाचा खंड पडणार नाही. पाऊस महाराष्ट्रात चालूच राहील”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा