महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. नेहमीप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं दमदार भाषण झालं. पण कार्यक्रमात आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले… ते म्हणजे अमित ठाकरे यांची बॉडी लँग्वेज. अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यामुळे या कार्यक्रमाची जबाबदारी आणि महत्त्वाची भूमिका तशी त्यांच्याकडेच होती. त्यात कार्यक्रमाच्या टीजरपासून ते बॅनरपर्यंत अमित ठाकरे यांचा फोटो ठळकपणे झळकत होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वांच्या नजरा अमित ठाकरे यांच्यावर खिळल्या होत्या. राज ठाकरे कार्यक्रमाला येण्याआधीच अमित तिथे उपस्थित होते. सर्व कॅमेऱ्यांचे लक्षही अमित ठाकरे यांच्याकडेच होतं. झालं असं की राज ठाकरे येण्यापूर्वी अमित ठाकरे वारंवार येरझाऱ्या मारताना दिसले. आणि तिथून त्यांच्या बॉडी लँग्वेजची चर्चा सुरू झाली. अमित यांच्या हालचाली, त्यांचा वावर आणि चेहऱ्यावरचे भाव उपस्थित असलेल्या कुणाच्याही नजरेतून सुटले नाहीत. पण यासोबतच एक प्रसंग चर्चेचा विषय ठरला. यावेळी अमित ठाकरे मंचावर भाषणासाठी उभे राहिले, भाषण करत असताना ‘मी भाषण विसरलो’ असं म्हणत ते निघून गेले.