मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2026 पासून गणेशोत्सव ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव – महागणेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
या वर्षीच्या स्पर्धेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच देशभरातील तसेच देशाबाहेरील (आंतरराष्ट्रीय) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उत्सवाची संकल्पना देश-विदेशात पोहोचविण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाचे आयोजन करताना समाजोपयोगी उपक्रम, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर यावर भर द्यावा, हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेसाठी मंडळांचे मूल्यमापन पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक उपक्रम, स्वच्छता व सुरक्षितता, आकर्षक सजावट, डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर आणि शिस्तबद्ध आयोजन या प्रमुख निकषांवर करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी https://ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. राज्यभरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.
००००
संजय ओरके/विसंअ