• Thu. Jun 18th, 2026
    श्रीकांत शिंदेंचा पुढाकार, मे महिन्यापासून चर्चा, विलीनीकरणाची इन्साईड स्टोरी, तिघा फुटीर ‘संजय’पैकी एकाला केंद्रात राज्यमंत्रिपद

    Operation Tiger : या सर्व प्रक्रियेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभा अध्यक्षांसोबतचा सर्व संवादही त्यांनीच पार पाडल्याचे समजते. हे खासदार वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीत कसे पोहोचतील, याची जबाबदारी मात्र एकनाथ शिंदे यांनी पार पाडल्याचे कळते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    संजय व्हनमाने, मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊपैकी सहा खासदारांना गळाला लावल्यानंतर बुधवारी त्यांचा स्वतंत्र गट तयार करून हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्याबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता आणि विलीनीकरणाची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी याबाबतचा अधिकृत निर्णय आठवडाअखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. फुटीर खासदारांमध्ये संजय देशमुख, संजय जाधव आणि संजय दिना पाटील अशा तीन संजय नामक खासदारांचा समावेश आहे, त्यापैकी एकाला केंद्रात राज्यमंत्रिपद मिळणे निश्चित मानले जाते.

    मे अखेरीस बैठका पुन्हा सुरु

    शिवसेना (उबाठा) पक्षाच्या खासदारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरापासून चर्चा सुरू होती. पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई होऊ नये, यासाठी सहा खासदारांचा गट तयार करण्याबाबत घडामोडी सुरू होत्या. मात्र, या खासदारांच्या बैठकीबाबत माध्यमांमध्ये बातम्या पसरल्याने या प्रक्रियेला काहीशी खीळ बसली होती. मात्र, मे महिन्याअखेरीस बैठकांना पुन्हा सुरुवात झाली. अखेर या सहा बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र मंगळवारीच लोकसभा अध्यक्षांना दिले होते.

    श्रीकांत शिंदेंचा पुढाकार

    स्वतंत्र गट म्हणून त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली असून, हा गट शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबतही आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभा अध्यक्षांसोबतचा सर्व संवाद त्यांनी पार पाडल्याचे समजते. हे खासदार वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीत कसे पोहोचतील, याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी पार पाडल्याचे कळते.
    Maharashtra TimesMilind Narvekar : उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर, ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे रात्री 10.50 वाजता बुचकळ्यात टाकणारे ट्वीट

    अधिकृत घोषणेसाठी २१ जूननंतरच मुहूर्त

    दरम्यान, वास्तविक येत्या दोन दिवसांत या विलीनीकरणाचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार होता. मात्र, काही तांत्रिक बाबी अद्याप शिल्ल्क आहेत. शिवाय, काही कायदेशीर पेचप्रसंग उद्भवू नयेत, तसेच आमदारफुटीच्या प्रक्रियेवेळच्या कायदेशीर लढाईची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हा निर्णय थोडा विलंबाने होणार असल्याचे समजते.

    Shiv Sena UBT Splits : उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे भाजप आणि शिंदे गटाची राजकीय रणनीती काय?

    शिवसेनेच्या वर्धापनदिनी १९ जूनला विलीनीकरणाची प्रक्रिया जाहीर करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू होती. मात्र, अजून काही तांत्रिक गोष्टी शिल्लक असल्याने आता ही घोषणा १९ जून रोजी होण्याची शक्यता धूसर आहे. विलीनीकरणाची अधिकृत घोषणा २१ जूननंतर कधीही जाहीर होणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. बुधवारी दुपारनंतर ते मुंबईत परतल्याचे कळते.
    Maharashtra TimesNitin Deshmukh : उद्धव साहेब, एकच विनंती… सुरत रिटर्न आमदार नितीन देशमुखांची पदाधिकारी नेमणुकीवरुन मोठी मागणी

    संजय जाधव यांना केंद्रात राज्यमंत्रिपद?

    शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांच्या या गटाने याआधीच्या बैठकीत केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याची मागणी केली होती. त्यावर, राज्यमंत्रिपद देऊ, असा शब्द शिवसेना नेतृत्वाने दिला होता. त्यानुसार एक राज्यमंत्रिपद देण्यात येणार असून, मराठवाड्यातील खासदार संजय जाधव यांच्या गळ्यात ही माळ पडणार असल्याचे समजते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा