• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai News : दोन दिवसांत 16000 चालकांवर कारवाई, 2 कोटींचा दंड, 200 ठिकाणी नाकाबंदी

    मुबंईत पोलिसांनी होळी आणि धुलिवंदन या दोन दिवशी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई केली. या कारवाईत चलनाच्या माध्यमातून 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 16 हजार चालकांवर कारवाई करण्यात आली. तर 159 मद्यपी चालकांची धरपकड करण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : होळी आणि धुळवड या दोन दिवसात मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 16727 चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या 159 मद्यपी चालकांची या विशेष मोहिमेत धरपकड करण्यात आली. यासाठी पोलिसांनी संपूर्ण मुंबईत सुमारे दोनशे ठिकाणी नाकाबंदी लावली होती. मुंबईमध्ये होळी आणि धुळवड मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. सणाच्या उत्साहाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी संपूर्ण मुंबईत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या दोन दिवसांत वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. त्यानुसार सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

    या मोहिमेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे वेगवेगळ्या नियम मोडणाऱ्या १६७२७ वाहनांवर ई चलान जारी करण्यात आले. या चलानच्या माध्यमातून पोलिसांनी सुमारे 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये सर्वाधिक 42 लाख 97 हजारांचा दंड विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    पोलिसांच्या वतीने ब्रेथ ऍनालायझरचा वापर करण्यात आला होता. दारू पिऊन वाहन चालविणारे 159 चालक या चाचणीमध्ये अडकले गेले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचे लायसन्स पुढील कारवाईसाठी आरटीओकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या कारवाईतून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चांगला धडा मिळाला आहे. वाहन चालक आणि इतरांच्या सुरक्षेसाठीच अशाप्रकारची कारवाई केली जाते. पोलिसांकडून वारंवार याबाबत आवाहन केलं जातं. पण तरीही अनेक जणांकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसतं.

    पोलिसांची कारवाई

    • वेगमर्यादा ओलांडणे – ४४८६
    • विना हेल्मेट – ४३१७
    • रहदारीस अडथळा निर्माण करणे – २५३२
    • सिग्नल मोडणे – ६१०
    • ट्रीपल सीट – ५३०
    • विना लायसन्स – ४३१
    • नो एंट्री – २७८
    • विरुद्ध दिशेने वाहन चालविणे – २०
    • विनाकारण हॉर्न – ०२
    • इतर – २६०३
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा